कोंढवा पोलिसांची कामगिरी : तिघांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर आणि ग्रामीण भागातील डिलेव्हरी बॉय आणि इतर नागरिकांच्या दुचाकी चोरणाऱ्या अट्टल सराईत तीन चोरट्यांकडून एकूण ७,३०,०००/- रुपये किमतीच्या २० दुचाकी जप्त करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे.
कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चोरी प्रकरणी घडलेल्या गुन्ह्याचा उलगडा करण्याच्या उद्देशाने पेट्रोलिंग करताना, सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरीच्या वाहनांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सूचना दिल्या होत्या.
तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे आणि त्यांच्या पथकातील अंमलदार संतोष बनसुडे आणि सागर भोसले यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत तपास केला. हवालदार निलेश देसाई यांनी फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून संशयित वाहन चोरट्यांची ओळख पटवली.
सदर संशयित आरोपी ध्रुव ग्लोबल शाळेच्या मागील बाजूस मोकळ्या जागेवर नेहमी जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, संतोष बनसुडे, सागर भोसले, शाहिद शेख, सुरज शुक्ला, सुजित मदन यांच्या नेतृत्वाखाली दोन टीम तयार करून त्याठिकाणी छापा टाकला.
तिथे रस्त्याच्या कडेला लागलेल्या दोन दुचाकी आणि तीन इसम गप्पा मारत असल्याचे दिसले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले आरोपी गौस मिरासाहब शेख (वय २० वर्षे), मूळ रा. पो. बावलगाव, ता. औराद, जि. बिदर, कर्नाटक, सध्या रा. हांडेवाडी, पुणे. शाहरुख कासीम शेख (वय २५ वर्षे), मूळ रा. पो. गुंडपंत दापका, ता. मुखेड, जि. नांदेड, सध्या रा. हांडेवाडी, पुणे. जुबेर अहमद मंगरुळे (वय २९ वर्षे), मूळ रा. पो. गुंडपंत दापका, ता. मुखेड, जि. नांदेड, सध्या रा. दिघी.
या आरोपींनी दोन बुलेट, सहा स्प्लेंडर, तीन अॅक्टिव्हा, एक ज्युपिटर, दोन शाईन, एक ड्रिम युगा, तीन प्याशन, आणि दोन एच एफ डिलक्स अशा दुचाकी चोरल्याचे कबूल केले. चोरी केलेल्या दुचाकी ग्राहक मिळेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्याचे सांगितले.
त्यांच्याकडून एकूण २० चोरीच्या दुचाकी जप्त करून एकूण ७,३०,०००/- रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात कोंढवा पोलीस स्टेशनचे ९, हडपसरचे २, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे २, वानवडी, मुंढवा, लोणीकंद, यवत, चिखली, चिंचवड पोलीस स्टेशनचे प्रत्येकी १ असे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे आणि पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, गोरखनाथ चिनके, सागर भोसले, संतोष बनसुडे, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला, आणि सुजित मदन यांच्या पथकाने केली आहे.

