माहिती देणाऱ्यास पोलीसांकडून दहा लाखांचे बक्षीस
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेला सहा दिवस उलटले असतानाही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींची कसून चौकशी केली आहे. पोलिसांनी आरोपींची रेखाचित्रे जाहीर केली असून, त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यांना दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. नागरिकांना काही माहिती मिळाल्यास पोलिसांना त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तपासासाठी तीनशेहून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत.
इतर जिल्ह्यांतील दोनशेपेक्षा अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. पीडित तरुणी आणि तिच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार आरोपींची रेखाचित्रे तयार करण्यात आली आहेत. तपासादरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले गेले असून, त्या वेळेतील मोबाईल धारकांची माहिती एकत्रित करण्यात आली आहे.
तपासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जात आहे. संशयित आरोपीचे वर्णन: पहिल्या आरोपीचे वय सुमारे २५ वर्षे असून, वर्ण सावळा, मध्यमबांधा आहे. त्याने जिन्स पँट, शर्ट, पायात चप्पल, आणि काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते.
त्याची बोलीभाषा मराठी आहे. दुसऱ्या आरोपीचे वय सुमारे ३० वर्षे आहे, वर्ण सावळा, त्याने जिन्स पँट, पूर्ण बाह्यांचा शर्ट आणि करड्या रंगाचे स्वेटर घातले होते. त्याची दाढी-मिशी वाढलेली आहे आणि त्याची बोलीभाषा हिंदी आहे.
तिसऱ्या आरोपीचे वय सुमारे २५ वर्षे आहे, वर्ण सावळा, त्याने लेदर जॅकेट घातले असून, त्याची बोलीभाषा मराठी आहे. आरोपींबाबत माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस दिले जाईल, आणि त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
या बाबतीत संपर्क साधण्यासाठी कोंढवा पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर (मो. क्र. ८६९१९९९९८९), पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील (मो. क्र. ९९२२००८७६८), आणि गुन्हे शाखेतील युनिट ५ पोलिस निरीक्षक युवराज हांडे (मो. क्र. ९३०७५४५०४५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. तसेच, कोंढवा पोलिस स्टेशनमधील ०२०-२६९३०७८० या क्रमांकावरही संपर्क साधता येईल.
















