स्वारगेट पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : स्वारगेट एस.टी. स्टँड परिसरात प्रवाशांना जबरदस्तीने लुटून चोरी करणाऱ्या रिक्षा चालकांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांनी चोरी केलेला माल आणि वापरलेली रिक्षा असा एकूण ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. फिर्यादी हे स्वारगेट येथील कात्रज बिबवेवाडी पी.एम.पी.एम.एल. बस स्टँडसमोरून २७ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास बिबवेवाडी, पुणे येथील राहत्या घरी जाण्यासाठी प्रवासी रिक्षामध्ये बसले.
त्या वेळी रिक्षाचालकाने “फोन करायचा आहे” असा बहाणा करून फिर्यादींचा चालत्या रिक्षामध्येच मोबाईल काढून घेतला. त्यानंतर पर्वती इंडस्ट्रीज जवळील पी.एम.पी.एम.एल. बस स्टॉप जवळील सार्वजनिक शौचालयाजवळ रिक्षा थांबवली. त्यानंतर स्वामी विवेकानंद रस्त्याने गंगाधाम चौकमार्गे लुल्लानगर परिसरात रिक्षा फिरवून फिर्यादीकडील ५०० रुपये रोख रक्कम घेतली.
फिर्यादींच्या नातेवाईकांकडून ऑनलाईन ४,००० रुपये मागवून घेतले आणि फिर्यादींच्या गळ्यातील चांदीची चेन तसेच मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. मोबाईलच्या गुगल पे चा पासवर्ड विचारून घेतला. फिर्यादीला धक्काबुक्की करून धमकावले आणि लुल्लानगर ब्रिजजवळ, कोंढवा, पुणे येथे सोडून रिक्षातून पळून गेले.
यावरून फिर्यादीने सदर रिक्षाचालक व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध तक्रार दाखल केली असून त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनमधील तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आदेश दिले होते.
त्यानुसार स्वारगेट पोलीस स्टेशनमधील तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस निरीक्षक रविंद्र कस्पटे आणि तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने १०० ते १५० सीसीटीव्ही फुटेज तपासली. गुन्हा रात्रीच्या वेळी घडल्याने उपयुक्त माहिती मिळत नव्हती. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा शोध घेण्यात आला.
आरोपी रोहित सुभाष चव्हाण (वय २३ वर्षे, व्यवसाय रिक्षाचालक, रा. गंगानगर लेन नं. ७, भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर, पुणे) हा आपल्या राहत्या घराजवळ आढळून आला. त्याला त्याने गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षासह ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर त्याचे इतर साथीदार १) मयूर ऊर्फ संकेत प्रकाश चव्हाण (वय १९ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. सरवदे यांच्या चाळीत, रूम नं. ३, गल्ली नं. ३, एच.पी. पेट्रोल पंपाजवळ, मंतरवाडी, उरळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे), २) सुदर्शन शिवाजी कांबळे (वय २२ वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, डी/२०७, आरएमडी कॉलेज शेजारी, वारजे माळवाडी, पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करून चोरी केलेला माल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे हे करीत आहेत.
सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर १) सिंहगड रोड पोलीस स्टेशन, २) बंडगार्डन पोलीस स्टेशन, ३) बिबवेवाडी पोलीस स्टेशन, ४) भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि ५) स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.
ही कामगिरी स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे यांनी पार पाडली.

