वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खोटे प्रमाणपत्र दाखवून दवाखाना चालवत उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरला वारजे माळवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा इसम वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मुळव्याध उपचार केंद्र, श्रीकृष्ण पॅलेस, सय्यदनगर, वारजे माळवाडी येथे दवाखाना चालवत होता.
पोलिसांनी विभूती बिमल बागची (वय ४३ वर्षे, रा. गोकुळनगर पठार, वारजे माळवाडी) याला अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. हा इसम दवाखाना उभारून (N.D.), (B.E.M.S.), (N.D.) ही पदवी घेतल्याचे भासवून महाराष्ट्र काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनकडून मान्यता प्राप्त शैक्षणिक अर्हता न घेता बनावट प्रमाणपत्र सादर करून नोंदणी करत व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्याच्या विरुद्ध तक्रारी अर्ज पोलीस ठाण्यात प्राप्त झाला होता. प्राप्त तक्रारी अर्जाच्या आधारावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार घटनास्थळी जाऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला.
विभूती बिमल बागची हा बनावट प्रमाणपत्रांचा वापर करून पेशंटवर उपचार करताना, तसेच कोणत्याही शैक्षणिक अर्हतेशिवाय गोळ्या-औषधे देत असल्याचे निष्पन्न झाले.
घटनास्थळी वरिष्ठांनी आणि वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार भिंगारदिवे, गाडे, पाटील आणि महिला पोलीस अंमलदार किंद्रे यांनी तपास चालू केला.
आरोपीस शिताफीने ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्हा उघडकीस आणला आहे. ही कारवाई वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख, पोलीस अंमलदार भिंगारदिवे, गाडे, पाटील आणि महिला पोलीस अंमलदार किंद्रे यांनी केली आहे.
















