गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे वाढते प्रकार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, सुरुवातीला थोडीशी रक्कम परत देत, नंतर कोणताही परतावा न देता एका तरुणीची १७ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
याबाबत, शिवाजीनगर येथे राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी इनव्हेस्टमेंट लीडिंग एक्सचेंज या ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३० मे ते २२ जुलै २०२४ या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींना आरोपींनी एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये समाविष्ट केले. त्या ग्रुपमधील सदस्य शेअर मार्केटविषयी माहिती शेअर करत होते आणि गुंतवलेल्या रकमेवर चांगला मोबदला मिळत असल्याचे संदेशांचे स्क्रीनशॉट शेअर करत होते. हे पाहून फिर्यादी तरुणीलाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा झाली.
आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी फिर्यादींना युबीएस नावाचे अॅप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करण्यास सांगितले. त्यामध्ये अकाउंट तयार करण्यास सांगून, सुरुवातीला थोडीशी रक्कम परत देत त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांवर रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगितले. अॅपवर दाखवल्याप्रमाणे, त्यांनी काढलेल्या अकाउंटमध्ये त्यांच्या नावावर रक्कम जमा असल्याचे दिसत होते.
त्यामुळे ग्रुप अॅडमिन सांगेल तसे त्यांनी त्या रकमा पाठवल्या. त्यांनी एकूण १७ लाख ६८ हजार ८२० रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीला त्यांना नफा मिळत असल्याचे दिसत होते. मात्र, पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर, वेगवेगळी कारणे सांगून आणखी पैसे भरण्यास सांगण्यात आले.
यामुळे त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी या प्रकरणाचा तपास करत आहेत.