१७ तरुणांना दिले बनावट नियुक्ती पत्र
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रेल्वेमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून नोकरीचे नियुक्तीपत्र देण्याचा बहाणा करुन एका महाभागाने पुण्यातील १७ तरुणांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे.
याबाबत पिंपरी येथील ३५ वर्षाच्या तरुणाने बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेश राजगुरु (वय ५०, रा. हरीविश्व अपार्टमेंट, पार्थडी शिवार, नाशिक) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार २०२१ पासून आतापर्यंत पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे घडला होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना राजेश राजगुरु याने रेल्वेमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदावर नोकरीचे नियुक्ती पत्र देण्याचा बहाणा करुन विश्वास संपादन केला.
त्यांच्याकडून ऑनलाईन व रोख असे १० लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर अनेक महिने राजगुरु टाळाटाळ करत होता. त्याने फिर्यादी यांच्या ई-मेलवर रेल्वेत नियुक्ती केल्याचे बनावट नियुक्तीपत्र पाठविले व ते खरे असल्याचे भासविले.
या नियुक्तीपत्रात त्यांना नाशिक येथे नियुक्ती केल्याचे दाखविले होते. त्यानुसार ते नाशिकला गेले. तेव्हा त्यांची अशी कोणतीही नियुक्ती करण्यात आली नसून ते पत्र बनावट असल्याचे त्यांना समजले.
त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली आहे. अशा प्रकारे अजून १७ जणांची राजेश राजगुरु याने पैसे घेऊन किमान ५० ते ६० लाख रुपयांची फसवणुक केली आहे. त्यापैकी काही जण तक्रार देण्यास पुढे आले आहेत. हा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण हे करीत आहेत.
