दुसर्या समाजातील महिलेशी लग्न केल्याचा गैरसमज
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दुसऱ्या समाजातील महिलेशी लग्न केल्याच्या गैरसमजातून तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाईल, रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत रहाटणी येथे राहणाऱ्या एका ३९ वर्षाच्या तरुणाने वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मुलतानाराम सुतार (रा. गंगाधाम चौक, मार्केटयार्ड), वासुसिंग भाटी (रा. टिळेकरनगर, कोंढवा), दलपतसिंह देवडा (रा. भवानी पेठ), सवाईसिंग बाडमेर (रा. वारजे) यांच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार वारजेतील माई मंगेशकर हॉस्पिटलजवळ १७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आपल्या व्यवसायात एका महिलेला भागीदार म्हणून घेतले त्यावरुन फिर्यादी यांनी दुसऱ्या समाजातील महिलेशी लग्न केले असा गैरसमज त्याच्या जातीतील लोकांनी करुन घेतला होता.
फिर्यादी हे हार्डवेअरचे सामान घेऊन दुचाकीवरुन कात्रजकडे जात होते. त्यावेळी फिर्यादी ओळखीचे आरोपी मोटारसायकलवरुन आले. त्यांनी फिर्यादी यांची गाडी थांबून त्यांना हाताने मारहाण केली.
त्यांच्या खिशातील मोबाईल व रोख ४ हजार रुपये असा ऐवज जबरदस्तीने काढून घेऊन चोरुन नेला. आपण दुसऱ्या समाजातील महिलेशी लग्न केल्याने त्यांनी मारहाण केली, हे कारण समजल्यानंतर त्यांनी आता फिर्याद दिली आहे.
