विरोधी टोळीचा गेम करण्यासाठी बाळगले होते पिस्टल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक व खंडणी विरोधी पथकाने दोघांना पकडून त्यांच्याकडून १४ लाख ६० हजार रुपयांचे मॅफेड्रॉन (एम डी) हस्तगत केले आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यांच्याकडे सापडलेल्या पिस्टलने विरोधी टोळीचा गेम वाजविण्यात येणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कारवाईने एक गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.
बॉबी भागवत सुरवसे (वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) आणि तोसिम ऊर्फ लड्डु रहिम खान (वय ३२, रा. दर्गा रोड, कसबा पेठ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी माहिती दिली.
खंडणी विरोधी पथक व अंमली पदार्थ विरोधी पथक गेले काही दिवस अंमली पदार्थांची तस्करी करणार्यांचा शोध घेत होते. त्याबाबत पोलिसांना महत्वाचे धागेदोरे मिळाले. त्यानंतर शुक्रवार पेठेतील डायमंड बिल्डिंगच्या खाली पोलिसांनी दोघांना पकडले.
त्यांच्याकडे १४ लाख ६० हजार रुपयांचा मॅफेड्रॉन (एम डी), देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे व इतर ऐवज असा १६ लाख ५७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडे सापडलेल्या पिस्टलबाबत चौकशी करता, त्यांच्या विरोधी टोळीचा गेम करण्यासाठी हे पिस्टल आणण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नेमकी कोणाची हत्या करण्यासाठी हे पिस्टल आणण्यात आले होते, याचा तपास सुरु आहे. सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक हे अधिक तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, सहायक फौजदार सुनिल पवार, पोलीस अंमलदार साहिल शेख, सुरेंद्र जगदाळे, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, अझिम शेख, आझाद पाटील, अमोल राऊत, पवन भोसले, निलम पाटील यांनी केली आहे.
