एमबीएसाठी पैसे घेतले एकाने, मागताहेत दुसर्याला, मित्राला मारहाण
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : एमबीए साठी कोथरुडच्या एमआयटी येथे प्रवेश मिळावा, म्हणून त्यांनी २ लाख २० हजार रुपये दिले. परंतु, प्रवेश मिळाला लोणी काळभोरमधील कॉलेजमध्ये. त्यामुळे एजंटला दिलेले पैसे परत करावेत, म्हणून चौघांनी मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. क़ाचेची बाटलीने पाठीत तसेच सिलिंग फॅनच्या पात्याने मारहाण केली.
याबाबत यासीन ईस्माईल शेख (वय ३९, रा. युनिटी कॉम्प्लेक्स, रास्ता पेठ) यांनी लष्कर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी फुरकान शेख, इरफान शेख (रा. कॅम्प) व अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवाजी मार्केटमध्ये रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यासीन शेख व इरफाने शेख हे एकमेकांचे मित्र आहे. इरफान शेख याच्या मुलाला एम बी ए करीता एम आय टी कोथरुड येथे अॅडमिशन मिळवून देण्याकरीता यासीन शेख याने इरफान शेख याची बंटी नावाच्या एजंटशी ओळख करुन दिली.
हा अॅडमिशन करुन देईल, असे सांगितले. या बंटीने अॅडमिशनसाठी २ लाख २० हजार रुपये घेतले होते. परंतु, एम आय टी कॉलेजच्या कोथरुड येथे अॅडमिशन न होता ते लोणी काळभोर या ठिकाणी झाले.
अॅडमिशनसाठी बंटी याने घेतलेले पैसे फिर्यादी यांना मिळाले असा समज इरफान यांचा झाला़ म्हणून इरफान याने फिर्यादीकडे पैश्यांची मागणी केली. तेव्हा फिर्यादी यांनी मी तुमच्याकडून पैसे घेतले नाहीत.
तुम्ही माझ्याकडे पैसे मागू नका, असे वेळोवेळी सांगितले होते. त्यानंतर रविवारी फुरकान शेख याने फिर्यादीला बोलावून घेतले. अॅडमिशनचे पैसे परत देण्याच्या कारणावरुन शिवीगाळ केली.
पैसे परत कर नाही तर तुला ठार मारु, अशी दमदाटी केली. हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काचेच्या बाटलीने पाठीत मारहाण केली. सिलिंग फॅनच्या पात्याने मारण्याचा प्रयत्न केला. हा तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमत तरटे हे करीत आहेत.
