वाहनचालकांना रस्ते सुरक्षेचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : इंद्रेश्वर साखर कारखाना येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वतीने “सुरक्षित ऊस वाहतूक अभियान” यशस्वीपणे पार पडले. या उपक्रमात वाहनचालकांना ऊस वाहतूक करताना रस्ते सुरक्षेचे पालन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक अविनाश अंभोरे यांनी वाहनांच्या पुढील बाजूस आणि मागील बाजूस लाल रंगाच्या रिफ्लेक्टर पट्ट्या व पडदे लावणे, वाहनात क्षमता ओलांडून ऊस न भरणे, मोबाईलचा वापर टाळणे, तसेच मद्यपान करून वाहन चालवू नये या महत्वाच्या सूचना दिल्या.
अपघात टाळण्यासाठी वाहनांची योग्य देखभाल आणि आरटीओ कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला. मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक कोमल ढांगे यांनी ऊस वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. “आपल्या काळजीपूर्वक वाहन चालवण्यामुळे सामान्य नागरिकांचे जीव वाचू शकतात,” असे त्यांनी सांगितले.
इंद्रेश्वर साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक अशोक जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, कारखान्याकडून दरवर्षी वाहनांना रिफ्लेक्टर पट्ट्या व पडदे मोफत पुरवले जातात. वाहनधारकांनी नियमांचे पालन करून अपघातांना आळा घालावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या अभियानाला प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी गजानन नेरपगार यांचा मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन निरीक्षक अविनाश अंभोरे, सहाय्यक निरीक्षक कोमल ढांगे, चालक कृष्णा मोरे, शेती अधिकारी हनुमंत जाधव, केनयार्ड सुपरवायझर हनुमंत तौर, वाहन इन्चार्ज किशोर बोराडे, सुरक्षा अधिकारी किरण ठोंगे, ऑपरेटर सिध्दरामेश्वर मुलगे आणि इंद्रेश्वर साखर कारखान्यातील अनेक अधिकारी तसेच ऊस वाहतूक वाहन मालक व चालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी महाव्यवस्थापक अशोक जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.















