महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खुन प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी येरवडा खुल्या कारागृहातून बुधवारी पसार झाला. अनिल मेघदास पटेनिया (वय ३५, रा. मु़ पो. म्हारलगाव, पो. वरल, राधाकृष्णनगरी, टिटवाळा, कल्याण, जि. ठाणे) असे पळून गेलेल्या कैद्यांचे नाव आहे. गेली ७ वर्षे तो तुरुंगात होता.
याबाबत वरिष्ठ तुरुंगाधिकारी राजेंद्र वसंत मरळे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिल पटेनिया याला खुन प्रकरणात २ जून २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात होता. त्याच्यावरील खटल्याचा गेल्या वर्षी निकाल लागला.
त्याला एक वषापूर्वी १२ डिसेंबर २०२३ रोजी जन्मठेप व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा आणि दंड न भरल्यास आणखी एक वर्षे कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याला सुरुवातीला नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी ठेवण्यात आले होते.
त्यानंतर १५ जून २०२४ रोजी नाशिक येथून येरवडा कारागृहात हलविण्यात आले. त्यानंतर त्याचे वर्तन पाहून त्याची खुल्या कारागृहात रवानगी करण्यात आली होती. बुधवारी दुपारी १२ वाजता कैद्यांची मोजणी केली असता अनिल पटेनिया हा पळून गेला असल्याचे लक्षात आले. त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले तपास करीत आहेत.















