धाराशिव येथून घेतले ताब्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे – आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरण व खून प्रकरणात पुणे पोलिसांनी धाराशिव येथून पाचव्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव आतिश जाधव (वय २०) असे आहे.
गेल्या काही दिवसांपासून पोलीस पथके आरोपीच्या मागावर होती. धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात याआधी चार आरोपींना अटक करण्यात आली असून आतिश जाधव हा पाचवा आरोपी आहे.
सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी पवन शर्मा (वय ३०), नवनाथ गुरसाळे (वय ३१), विक्की शिंदे (वय २८) आणि सोन्या ऊर्फ अक्षय जावळकर (वय २९) यांना अटक केली आहे. अक्षय जावळकर हा पूर्वी सतीश वाघ यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होता. मात्र, वाद झाल्याने त्याने खोली सोडली होती.
या वादाच्या रागातून अक्षय जावळकरने पवन शर्माला सतीश वाघ यांच्या खुनासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिली. पवन शर्माने नवनाथ गुरसाळे, विक्की शिंदे आणि आतिश जाधव यांच्याशी संगनमत करून खूनाचा कट रचला. ९ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतीश वाघ यांचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला.
त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला. पोलिसांनी अपहरणासाठी वापरलेल्या कारच्या आधारावर सुरुवातीला दोन आरोपींना पकडले. त्यानंतर अक्षय जावळकर आणि विक्की शिंदे यांना अटक करण्यात आली. आता आतिश जाधव यालाही अटक करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
