अनैतिक संबंधाच्या संशयावरुन येरवड्यातील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरून ठेकेदारावर कुर्हाडीने हल्ला करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत ठेकेदार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रितेश लक्ष्मण परदेशी (वय ४८, रा. जयजवाननगर, येरवडा) हे हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. येरवडा पोलिसांनी उमेश रमेश वाघमारे (वय ३८, रा. बालाजीनगर, धनकवडी) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना सोमवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास येरवड्यातील जयजवाननगर येथे जय शक्ती मंडळाजवळ पॅलेस ऑफ थिम केक शॉपसमोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी परदेशी हे ठेकेदारी व्यवसायात कार्यरत असून, दुचाकीवरून प्रवास करत होते.
त्या वेळी वाघमारे याने त्यांना अडवून, “लफडे करतो काय, आज तुला जिवंत सोडणार नाही,” असे म्हणत कुर्हाडीने त्यांच्या डोक्यावर जोरात वार केला. डोक्यावर गंभीर जखम झाल्याने परदेशी खाली पडले.
त्यानंतर वाघमारे याने पुन्हा कुर्हाडीने वार करण्याचा प्रयत्न केला. परदेशी यांनी जीव वाचवण्यासाठी हात पुढे केल्याने त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली. सध्या परदेशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी येरवडा पोलीस अधिक तपास करत असून, हल्ल्याच्या कारणांचा शोध घेत आहेत.
