अलंकार थिएटरजवळील घटना : बंडगार्डन पोलिसांनी दोघांना २४ तासांत अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कामावरून पायी घरी जात असताना रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशाला ५०० रुपये मागणाऱ्या दोघांनी नकार मिळाल्यावर कोयत्याने हल्ला केला. बंडगार्डन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना २४ तासांत अटक केली.
गौरव भारत धोकडे आणि आकाश बाळू कांबळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, आत्माराम धर्मा आडे (वय ४२, रा. अशोकनगर, येरवडा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजता, अलंकार थिएटरजवळील रिक्षा स्टँडवर आत्माराम आडे रिक्षाची वाट पाहत उभे होते.
यावेळी दोन दुचाकीस्वार आले आणि त्यांनी आडे यांना ५०० रुपये मागितले. नकार मिळाल्यावर त्यांनी शर्टात लपवलेला कोयता काढून त्यांच्या पोटात खुपसला. आत्माराम यांनी प्रतिकार केल्याने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर बंडगार्डन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.
पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पेट्रोलिंग दरम्यान आरोपींबाबत माहिती मिळवत तपास केला. हवालदार सारस साळवी आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शितोळे यांना बातमीदारामार्फत आय बी चौकात आरोपी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त दीपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, गुन्हे निरीक्षक संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, मोहन काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शितोळे, हवालदार सारस साळवी, आणि पोलीस अंमलदार ज्ञाना बडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे, महेश जाधव यांचा समावेश होता.
