गेल्या आठ महिन्यांपासून करत होत्या चोर्या, पाच गुन्हे उघडकीस
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : स्वारगेट एस.टी. बसस्थानकातील गर्दीचा गैरफायदा घेत महिलांच्या गळ्यातील व हातातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत ५ गुन्ह्यांमध्ये ४ लाख ८८ हजार रुपये किमतीचे ६० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या महिला दुर्गा अविनाश उपाध्याय (वय ३०, रा. म्हाडा कॉम्प्लेक्सजवळ, खडकी, मूळ रा. बापूनगर, गुलबर्गा, कर्नाटक), लक्ष्मी भिवा सकट (वय २५, रा. खडकी, मूळ रा. सोलापूर) स्वारगेट एस.टी. बसस्थानकात महिलांच्या गळ्यातील दागिने व हातातील बांगड्या चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने स्वारगेट पोलिसांनी गस्त वाढवली होती.
१९ डिसेंबर रोजी दुपारी गस्त घालत असताना दामिनी मार्शल पोलीस अंमलदार अनिता धायतडक यांनी दोन महिलांना संशयास्पदरित्या फिरताना पाहिले. त्यांनी पोलीस अंमलदार संदीप घुले व सुजय पवार यांना बोलावून घेत संशयित महिलांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान या महिलांनी ७ ते ८ महिन्यांपूर्वी आळंदी येथे जाणाऱ्या बसमधून एका महिलेच्या हातातील बांगडी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या पार्श्वभूमीचा तपास केल्यानंतर चोरीचा गुन्हा आधीच नोंद असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान ४ लाख ८८ हजार रुपये किमतीचे ६० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केला. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, पोलीस हवालदार मोराळे, तनपुरे, घुले, पवार, महिला पोलीस हवालदार सिताप, शिंदे, तसेच अंमलदार अनिता धायतडक यांचा समावेश होता.
