वाहतूक शाखेकडून ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष मोहिम
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दारु पिऊन वाहन चालविणाऱ्याविरुद्ध वाहतूक शाखेने मोठी मोहिम सुरु केली आहे. या वर्षी आतापर्यंत ५ हजार २५६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर रोजी ड्रंक अँड ड्राईव्हबाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
कोरोना काळात बर्थअनालायझरद्वारे चाचणी करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या काही वर्षात ड्रंक अँड ड्राईव्हची मोहिम थंडावल्यासारखी झाली होती. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीपासून वाहतूक पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिम नव्याने राबविण्यास सुरुवात केली.
३१ डिसेंबर रोजी मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करताना ब्लो पाईप (प्लास्टिक पाईप) एका व्यक्तीसाठी एक पाईप (युज अँड थ्रो) वापरण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
उल्लघंन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल़. या वर्षात २९ डिसेंबरपर्यंत ५ हजार २५६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात ५४९ जणांवर कारवाई करण्यात आली असून ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक १४३३ वाहनचालकांवर कारवाई केली गेली आहे.
