महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : “पुणे तिथे काय उणे” ही म्हण प्रसिद्ध असली तरी सध्या पुण्यातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. निसर्गरम्य आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे हे शहर आता अल्पवयीन गुन्हेगारांचे माहेरघर बनू लागले आहे. या परिस्थितीकडे सर्व राजकीय नेत्यांनी आणि पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
शहरातील तरुण पिढी चुकीच्या मार्गावर वळत असून, अनधिकृत फलकबाजीपासून सुरू होणारी गुन्हेगारी नंतर गंभीर स्वरूप धारण करत आहे. वाढदिवसाच्या फलकांपासून ते तलवारीने केक कापणे, भागातील राजकीय नेत्यांचा आश्रय घेणे, किरकोळ कारणावरून मारहाण करणे, आणि स्वतःला ‘भाई’ म्हणून मिरवणे असे प्रकार आता सर्रास सुरू आहेत.
पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यास राजकीय हस्तक्षेपामुळे टाळाटाळ होते, ज्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढते. काही पोलीस अधिकारी आणि गुन्हेगारांमधील साटेलोटे यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. तसेच, अनेक पोलीस कर्मचारी सिव्हिल ड्रेसमध्ये वावरत असल्याने पोलीस आणि गुन्हेगार यामध्ये फरक करणे कठीण झाले आहे.
पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे चालू आहेत. मसाज सेंटर, हॉटेलमधील वेश्या व्यवसाय, गुटखा, लॉटरी यांसारख्या व्यवसायांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे. काल मंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना गरज पडल्यास बदलण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, ही गुन्हेगारी स्थानिक स्तरावरच रोखणे आवश्यक आहे. यासाठी कठोर कारवाई करणारे अधिकारी पुण्यात आणणे आणि पुण्याचे “शिक्षणाचे माहेरघर” हे स्वरूप टिकवणे गरजेचे आहे.















