सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कुंभमेळ्याच्या नावाचा गैरवापर करून काही सायबर चोरटे सक्रिय झाले असून, त्याद्वारे फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी केले आहे.
कुंभमेळा या धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने सायबर गुन्हेगार इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल सुविधांचा गैरवापर करून भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत आहेत. ते बनावट वेबसाइट, लिंक किंवा इतर साधनांचा वापर करून नागरिकांची फसवणूक करतात.
भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या निदर्शनास ही बाब आली आहे. कुंभमेळ्यासाठी देणगी गोळा करण्याच्या नावाखाली बनावट वेबसाइटचा वापर करून आर्थिक फसवणूक केली जात आहे. त्याचप्रमाणे, ऑनलाइन बुकिंगद्वारे निवास व्यवस्था, दर्शन पास इत्यादी बुकिंगसाठी बनावट वेबसाइटद्वारे पैसे उकळले जात आहेत.
फसवणुकीपासून बचावासाठी खबरदारीचे उपाय
- बनावट लिंक टाळा : कुंभमेळासंबंधी कोणत्याही बनावट लिंक, वेबसाइट किंवा मेसेजवर क्लिक करू नका.
- सत्यता तपासा : कुंभमेळासंबंधी अधिकृत माहिती मिळवण्यासाठी https://kumbh.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- गोपनीय माहिती शेअर करू नका : आपली बँक खाते क्रमांक, पासवर्ड किंवा इतर संवेदनशील माहिती कोणालाही देऊ नका.
- फसवणुकीचा संशय आल्यास : सायबर हेल्पलाइन cybercrime.gov.in किंवा १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.
पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याची आणि कुंभमेळ्याशी संबंधित कोणत्याही अनधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्म्सपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
