शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन : कृष्णकुमार गोयल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वाढत्या कारखानदारीमुळे पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिक नकाशावर ठळकपणे अधोरेखित झाले आहे. धार्मिक सलोखा असणारे हे शहर शिक्षण, क्रीडा, कला, नाट्य, संस्कृती, संशोधन, आयटी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) अशा सर्वच क्षेत्रांत प्रगती करून जागतिक स्तरावर अग्रस्थानी यावे, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कृष्णकुमार गोयल यांचा कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर होते. तसेच महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, आणि संघाच्या अध्यक्षा सायली कुलकर्णी उपस्थित होते. कृष्णकुमार गोयल पुढे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडने मला घडविले.
शहराशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. शहरातील पत्रकारांनी एकत्र यावे आणि पुण्याप्रमाणे येथेही पत्रकार संघाची स्वतंत्र इमारत उभी करावी. त्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल. या पुरस्कारामुळे माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे, असे मी मानतो.” त्यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आणि शहराच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.