व्यापार्याचा जीएसटी नंबर पुर्नजिवित करण्यासाठी मागितली होती लाच
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : व्यापाऱ्याचा रद्द केलेला जीएसटी नंबर पुर्नजिवित करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना राज्य कर सह आयुक्त कार्यालयातील कर निरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
तुषारकुमार माळी (वय ३३) असे या राज्य कर निरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार हे वकिल आहे. ते जीएसटी ची कामे करतात व्यापारी अशिलाचा जीएसटी नंबर जीएसटी विभागाने रद्द केला होता. तो पुर्नजिवित करण्यासाठी यातील तक्रारदार हे त्या व्यापारी अशिलाच्या वतीने येरवड्यातील जीएसटी कार्यालय येथे गेले होते.
यावेळी करनिरीक्षक तुषारकुमार माळी याने तक्रारदार यांचे व्यापारी अशिलाचे काम करुन देण्यासाठी त्यांच्याकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली. त्याची या वकिलाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी मंगळवारी करण्यात आली. त्यावेळी तुषारकुमार माळी याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर येरवडा येथील वस्तु व सेवा कर भवन कार्यालय येथे सापळा रचण्यात आला. वकिलाकडून ५ हजार रुपये घेताना तुषारकुमार माळी याला पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे पुढील तपास करीत आहेत.
