वेल्ह्यातून तिघांना केली अटक : परिसरातून काढली धिंड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बिबवेवाडीतील अपर इंदिरानगर आणि सुपर परिसरात दहशत माजवण्यासाठी तिघांनी जवळपास २५ ते ३० वाहनांची तोडफोड केली. पहाटे पावणेतीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हातावर पोट असलेल्या नागरिकांच्या वाहनांचे नुकसान झाल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
बिबवेवाडी पोलिसांनी तिघा समाजकंटकांना वेल्हा तालुक्यातील सापेगाव येथून अटक केली असून, त्यांची परिसरातून धिंड काढली. अंडी ऊर्फ निरंजन देवकर, अभिषेक पांढरे आणि गणराज सुनील ठाकर (रा. अपर इंदिरानगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
बिबवेवाडी, पर्वती, जनता वसाहत या परिसरांत वारंवार वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडत आहेत. विशेषतः पहाटेच्या वेळेस वाहनांची तोडफोड होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सहा महिन्यांपूर्वीही याच भागात अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर वाहनांची तोडफोड झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील अपर इंदिरानगर परिसरात पहाटे पावणेतीनच्या सुमारास तिघांनी रस्त्यावर पार्क केलेल्या टेम्पो, कार, रिक्षा आणि दुचाकींवर कोयत्याने सपासप वार करत त्यांच्या काचा फोडल्या. हे टोळके एकामागोमाग एक वाहनांवर कोयत्याने हल्ला करत पुढे जात होते. आवाजामुळे काही लोक जागे झाले, मात्र तोपर्यंत आरोपी पळून गेले.
या तोडफोडीमध्ये एका कारचालकाला दुखापत झाली. तो कारमध्ये झोपला असताना टोळक्याने त्याच्या गाडीच्या काचा फोडल्या. त्यामुळे तुटलेल्या काचा त्याच्या अंगावर पडून तो जखमी झाला. त्यानेच पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास करून आरोपींचा मागोवा घेत वेल्हा तालुक्यातील सापेगाव येथून त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी या तिघांची परिसरातून धिंड काढली.
या प्रकरणी माहिती देताना पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे म्हणाले, “बिबवेवाडी परिसरात पहाटे २५ ते ३० वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून, आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती होऊ नये, याची काळजी घेतली जाईल. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.”
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संताप आहे. एका महिलेने सांगितले की, तिच्या गाडीच्या काचा तिसऱ्यांदा फोडण्यात आल्या आहेत. सहा महिन्यांपूर्वी याच भागात अशाच प्रकारे तोडफोड करणाऱ्या आरोपींना पकडून बुरखा घालून आणले होते, पण काही दिवसांतच ते पुन्हा बाहेर पडले.
आताही पोलिसांनी तिघांना बुरखे घालून आणले, मात्र ते कोण आहेत हे समजले नाही. “आमच्या वाहनांचे नुकसान झाले, ते भरून कोण देणार?” असा सवाल संतप्त नागरिकांनी केला.
