पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची जलद कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कर्वेनगर येथील डीपी रोडवर थांबलेल्या तरुणाकडून पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. कुणाल घावरे (वय २८, रा. नानासाहेब बराटे कॉलनी, कर्वेनगर) असे त्याचे नाव आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक वारजे माळवाडी येथे गस्त घालत असताना पोलीस अंमलदार प्रतिक मोरे यांना माहिती मिळाली की कर्वेनगर डीपी रोडवर एक तरुण पिस्तुल घेऊन थांबला आहे. त्यानुसार पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन संशयिताला ताब्यात घेतले.
संशयित कुणाल घावरे याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४१ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे लोखंडी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांनी ती जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, भाऊसाहेब पठारे यांच्या सूचनेनुसार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे, रंगराव पवार, गुन्हे निरीक्षक निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार विनोद भंडलकर, विनोद जाधव, गणेश सुतार, हरीश गायकवाड, प्रतिक मोरे, इसाक पठाण यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. याप्रकरणी पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस स्टेशन करत आहे.
