टेमघर धरणातील जमीन : उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकूनासह दोघांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : टेमघर धरणात जमीन संपादन झाल्यामुळे आठ जणांचे प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये प्रमाणे लाच मागण्यात आली. तडजोडीनंतर ३ लाख २० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यातील पहिला हप्ता म्हणून १ लाख ६० हजार रुपये स्वीकारताना, खासगी व्यक्तीसह शिरूर उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकूनाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
अव्वल कारकून सुजाता बडदे आणि खासगी व्यक्ती तानाजी मारणे (वय ४६, रा. इंदिरानगर, अप्पर सुपर, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. याबाबत ३९ वर्षीय नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.
तक्रारदाराची टेमघर धरणामध्ये जमीन संपादित झाल्यामुळे, शासनाकडून त्यांना शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे शेती आणि घरासाठी २ गुंठ्यांचा भूखंड देण्यात आला आहे. तक्रारदाराच्या घरातील चार सदस्यांसाठी आणि त्यांच्या सख्या भावाच्या घरातील चार सदस्यांसाठी असे एकूण आठ प्रस्ताव सुजाता बडदे यांच्याकडे प्रलंबित होते.
या भूखंडांचे प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी, उपविभागीय अधिकारी, शिरूर यांच्या समोर ते मांडून मंजुरी मिळवून देण्यासाठी सुजाता बडदे यांनी तक्रारदाराकडे प्रत्येक प्रस्तावासाठी सुरुवातीला ५० हजार रुपये (एकूण ४ लाख रुपये) लाचेची मागणी केली.
याबाबत ४ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७ फेब्रुवारी रोजी या तक्रारीची पडताळणी केली. त्यात सुजाता बडदे यांनी प्रत्येक प्रस्तावासाठी ४० हजार रुपये प्रमाणे एकूण ३ लाख २० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
ही रक्कम खासगी व्यक्ती तानाजी मारणे यांच्यामार्फत स्वीकारण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० फेब्रुवारी रोजी पुणे शहरातील शिरूर उपविभागीय कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून लाच रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून १ लाख ६० हजार रुपये स्वीकारताना तानाजी मारणे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर सुजाता बडदे हिलाही ताब्यात घेण्यात आले.
बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हा तपास पोलीस निरीक्षक अमोल भोसले करीत आहेत
