खंडणीविरोधी पथकाची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खंडणीविरोधी पथकाने एनडीए-खडकवासला रस्त्यावर सापळा रचून दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून २ पिस्तुले व ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनिकेत जाधव (वय २४, रा. खंडोबा मंदिराजवळ, धायरी गारमाळ) आणि गणेश तानाजी किवळे (वय २३, रा. सिंहगड किरकिटवाडी रोड, नांदोशी) अशी आहेत.
अनिकेत जाधव हा सराईत गुन्हेगार असून, त्याने आपल्या साथीदारांसोबत पूर्ववैमनस्यातून ओंकार सुतार, करण पटेकर आणि फैजल काझी यांच्यावर कोयत्याने हल्ला करून त्यांना जखमी केले होते. सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सिंहगड रोड पोलिसांनी अनिकेत जाधवसह सहा जणांना अटक केली होती.
खंडणीविरोधी पथक सोमवारी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार प्रफुल्ल चव्हाण आणि अमर पवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एनडीए-खडकवासला रोडवरील कोंढवे धावडे येथे एक जण पिस्तुल घेऊन थांबला आहे. या माहितीची खातरजमा करून पोलीस पथक त्वरित त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी दोघांना ताब्यात घेतले.
अनिकेत जाधव याच्याकडून १ देशी बनावटीचे पिस्तुल आणि १ जिवंत काडतूस, तर गणेश किवळे याच्याकडून १ देशी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे असा एकूण ४५,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ आणि सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे तसेच पोलीस अंमलदार प्रफुल्ल चव्हाण, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, सयाजी चव्हाण, मयुर भोकरे, अमोल आवाड, नितीन कांबळे, रवींद्र फुलपगारे, प्रविण ढमाळ आणि अमर पवार यांनी केली.
