महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : बार्शी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती शिवसृष्टीत भव्यदिव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जीवनगाथेचे अप्रतिम दर्शन घडवणारी भव्य फुलांची आरास, नेत्रदीपक विद्युत रोषणाई आणि फुलांनी साकारलेला शिवजन्म देखावा. या अद्वितीय सजावटीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीच्या पूजनाने झाली. विशेष म्हणजे प्रथम महिला भगिनींनी पूजन केले, त्यानंतर पोलीस दल, पत्रकार, शिवप्रेमी संघटना आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन संपन्न झाले.
कार्यक्रमास राज-विजय क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष विजय (नाना) राऊत, माजी नगराध्यक्ष आसिफ (भाई) तांबोळी, बार्शी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, माजी नगराध्यक्ष रमेश (आण्णा) पाटील, युवा उद्योजक रणजीत (दादा) राऊत तसेच शिवसृष्टी उभारणीसाठी मागणी करणारे नगरसेवक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजन्मोत्सवानंतर उपस्थित शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन करून मानवंदना दिली. फटाक्यांची आतषबाजी आणि गजराने संपूर्ण परिसर शिवमय झाला. बार्शी शहर व तालुक्यातील असंख्य शिवभक्त, कुटुंबीय आणि शिवप्रेमी नागरिकांनी शिवसृष्टीतील देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
या भव्यदिव्य सोहळ्याने बार्शीतील शिवप्रेमींसाठी एक ऐतिहासिक क्षण निर्माण केला. छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित हे भव्य देखावे भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
या कार्यक्रमामुळे संपूर्ण बार्शी शिवमय झाली, आणि शिवप्रेमींच्या मनात अभिमान, स्फूर्ती आणि एकता यांची नवी ऊर्जा संचारली. शिवरायांचे स्मरण करत त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
