नवीन कायद्यांचा प्रसार व जनजागृती अभियान
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : नवीन कायद्यांच्या प्रसार व प्रचारासाठी भारत सरकारने सर्व राज्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवस नवीन कायद्यांचा प्रचार करून जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, पोलीस उपअधीक्षक गौरीशंकर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली भूम शहरात दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा साबळे आणि त्यांच्या पिंक पथकाने जिल्हा परिषद हायस्कूल, भूम येथे विद्यार्थिनींना सुरक्षा व कायद्यांविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात डायल ११२ आपत्कालीन सेवा आणि नवीन कायद्यांविषयी माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे मुलींना त्यांच्या सुरक्षेबाबत जागरूक करणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अशा उपक्रमांमुळे समाजात सुरक्षा जाणीव वाढण्यास मदत होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकारांची व संरक्षणाच्या उपाययोजनांची माहिती मिळाल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते स्वतःच्या सुरक्षेसाठी सक्षम होतात.
पीडित महिलांसाठी कायदे (नारी संरक्षण कायदा)
भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत ३५४, ३५४A, ३७६ या कलमांऐवजी नवीन कायद्यानुसार बी. एन. एस. ६४, ६५, ७४, ७५ लागू करण्यात आले आहेत. महिलांवरील अत्याचार, छळ आणि बलात्कारासंबंधी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
लैंगिक अत्याचारविरोधी कायदे
POSCO कायदा (Protection of Children from Sexual Offences Act, 2012) अंतर्गत मुली आणि मुलांना लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देण्यासाठी कठोर कारवाई केली जाते.
कार्यस्थळी व सार्वजनिक ठिकाणी लैंगिक छळविरोधी कायदा
या कायद्यामुळे कोणत्याही कार्यस्थळी किंवा सार्वजनिक ठिकाणी महिला आणि मुलींना लैंगिक छळापासून संरक्षण मिळते.
डायल ११२ आपत्कालीन सेवा
ही सेवा पोलिस, अँब्युलन्स आणि अग्निशमन सेवांसाठी एकत्रित आपत्कालीन हेल्पलाइन आहे. आपत्कालीन परिस्थितीत ११२ वर कॉल करून त्वरित मदत मिळवता येते.
नशा विरोधी कायदे
नशेच्या पदार्थांच्या सेवन आणि विक्रीसंबंधी कठोर कायदे आहेत. विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
बाल कामगार कायदा
१४ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. बालमजुरी रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतर्क राहावे.
सायबर गुन्हे आणि सोशल मीडिया कायदे
सोशल मीडियावरील छळ, सायबर गुन्हे आणि गोपनीयतेच्या उल्लंघनासंदर्भात कायद्यांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करावा.
या कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक वर्षा साबळे (पिंक पथक प्रमुख), पिंक पथक उपविभाग भूम येथील महिला नाईक मते, पोलीस शिपाई नागटिळक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना कायद्यांविषयी माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या अधिकारांची आणि कर्तव्यांची जाणीव राहील आणि ते अधिक सजग व सुरक्षित राहू शकतील. अशा उपक्रमांमुळे समाजात सुरक्षितता वाढण्यास मदत होते.
