२२ बुलेटचे सायलेन्सर काढले : २५ हजार दंड वसूल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शहरात कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून लोकांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी मोहिम हाती घेतली.
या कारवाईत २२ बुलेट ताब्यात घेण्यात आल्या असून, त्यांचे सायलेन्सर काढून टाकण्यात आले. तसेच, वाहनचालकांकडून २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही बुलेट चालक मॉडिफाइड सायलेन्सर बसवून त्यामधून फटाके फोडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या आदेशानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलिसांच्या चार अधिकाऱ्यांसह १५ अंमलदारांची पथके तयार केली. त्यांनी लोणी काळभोर परिसरातील विविध भागांत ही कारवाई राबवली.
मोहीमेदरम्यान मॉडिफाइड सायलेन्सर आणि विना नंबर प्लेट असलेल्या एकूण २२ बुलेट गाड्या ताब्यात घेण्यात आल्या. या गाड्यांचे बदललेले सायलेन्सर काढून टाकण्यात आले, तसेच वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत २५ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.
ज्या गाड्यांना नंबर प्लेट नव्हत्या, त्यांच्यावरही कारवाई करून नंबर प्लेट बसवूनच संबंधित मालकांच्या ताब्यात वाहने देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली.
