इधांत जैनला मिळाले वेस्टइंडिज मास्टर्स संघाबरोबर सराव करण्याची संधी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : बार्शीला तगडी क्रिकेटपटू निर्मिती करणारा हब बनवण्याच्या दृष्टीने आनंद शेलार सातत्याने प्रयत्नशील आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देऊन ते भविष्यात भारतीय क्रिकेटसाठी खेळू शकतील, यासाठी त्यांनी स्वतःच्या मोठ्या संधींचा त्याग केला आहे. त्यांच्या अशाच कार्यामुळे बार्शीचे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर झळकत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक आनंद शेलार यांनी लाखोंच्या उत्पन्नाच्या अनेक संधींचा त्याग करून बार्शी आणि ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी स्वतःला समर्पित केले आहे. देशभरातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या क्रिकेट संघांकडून व असोसिएशनकडून प्रशिक्षकपदासाठी आकर्षक ऑफर्स मिळूनही, त्यांनी बार्शीला क्रिकेटपटू घडवण्याचे केंद्र बनवण्याचा निर्धार केला आहे.
क्रिकेट सेंटरच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारे खेळाडू महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध वयोगटांच्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत.
आनंद शेलार यांनी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका लिजेंड्सचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. यंदाही त्यांच्या शिक्षण, अनुभव, आणि कौशल्यांची दखल घेऊन त्यांची निवड वेस्ट इंडिज मास्टर्स संघाच्या प्रशिक्षकपदी झाली आहे.
या संघात ब्रायन लारा (कर्णधार), ख्रिस गेल, टिनो बेस्ट, नारसिंग देवनरीन, विल्यम पर्किन्स यांसारखे महान खेळाडू समाविष्ट आहेत. आंतरराष्ट्रीय मास्टर लीग (IML) ही 2025 मध्ये प्रथमच आयोजित केली जात असलेली एक विशेष T20 क्रिकेट स्पर्धा आहे.
या लीगमध्ये विविध देशांतील माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू भाग घेत आहेत. आनंद शेलार यांची वेस्ट इंडीज मास्टर्स संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. ब्रायन लारा यांच्या नेतृत्वाखालील हा संघ स्पर्धेत मोठ्या विजयासाठी तयारी करत आहे.
बार्शीतील युवा क्रिकेटपटूंना सुवर्णसंधी – इधांतचे उल्लेखनीय यश
बार्शीतील सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता ९ वी मध्ये शिकणारा विद्यार्थी इधांत सुमित जैन (राणावत) याला मुंबई- नेरूळ, डी वाय पाटील स्टेडियम येथे वेस्टइंडिज मास्टर्स संघाबरोबर सराव करण्याची सुवर्णसंधी मिळाली.
ब्रायन लारा, ख्रिस गेल ,नारसिंग देवनरीन, विल्यम पर्किन्स, टिनो बेस्ट या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सरावा मध्ये इधांत ने गोलंदाजी केली. वेस्टइंडिजचा वेगवान गोलंदाज टिनो बेस्ट याने इधांतला गोलंदाजी करताना पाहिले आणि त्याला बोलावून घेत त्याच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले.
त्याने इधांतला फिजिकल फिटनेस आणि गोलंदाजीच्या बारकाव्यांबाबत मोलाचे मार्गदर्शन केले आणि इंडिया टीममध्ये लवकरच तुझा चेहरा देखील पहावयास मिळेल अशी शाबासकीची थाप दिली.
अवघ्या १४ वर्षांच्या इधांतला वेस्टइंडिजसारख्या संघातील खेळाडूंचे मार्गदर्शन मिळणे ही मोठी उपलब्धी मानली जाते. त्याच्या कौशल्याची दखल घेत वेस्टइंडिज टीमने त्याला शुभेच्छा दिल्या.
