मार्च महिन्यात तीव्र उष्ण लाटांचा हवामान विभागाचा इशारा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : देशाच्या बहुतांशी भागात यंदा उन्हाळा अधिक त्रासदायक ठरणार आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये मार्च महिन्यापासून तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील (मार्च ते मे) तापमानाचा अंदाज हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. डी एस पे यांनी जाहीर केला.
यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात उन्हाळ्याच्या झळा वाढल्या. त्यात देशातील किमान तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक होते. १९०१ पासूनच्या नोंदीनुसार सरासरीपेक्षा अधिक किमान तापमानात यंदाचा फेब्रुवारी महिना पहिल्या क्रमांकावर राहीला आहे. फेब्रुवारी महिन्यात देशात १५.०२ अंश सेल्सिअस सरासरी किमान तापमानाची नोंद झाली आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात मार्च ते मे देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत किमान तापमान देखील सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे. मार्च महिन्यापासूनच तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, हरियाना, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या उत्तर भागात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पश्चिम किनारपट्टीवरील केरळ, कर्नाटकासह कोकण किनारपट्टीवर यंदा उष्णतेची लाट होती. सध्या सौम्य ला निना स्थिती असून लवकरच तटस्थ एल निनो निर्माण होण्याचे संकेत आहे. ही स्थिती कायम राहणार असल्याने त्याचा मान्सूनवर कोणताही प्रभाव पडणार नाही, असे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. डी एस पे यांनी सांगितले.
