मोबाइलवर छायाचित्रे पाठविणार्या लातूरच्या नियामकावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात दहावी -बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षक मंडळाच्या (राज्य मंडळ) मुख्यालयातच गैरप्रकार घडल्याचे निदर्शनात आले आहे. लातूरच्या नियामकाने नमुना उत्तर पत्रिकेचे फोटो काढून दोन शिक्षकांना पाठविल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी राज्य मंडळाच्या वतीने विजय भास्कर दोडे (वय ५९, रा. पाषाण) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी परमेश्वर पंढरी फड (वय ५४, रा. भारत विद्यालय, माकनी, ता. लोहारा, जि. धाराशिव) या नियामकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार राज्य शिक्षण मंडळाच्या शारदा सभागृहात २७ फेब्रुवारी रोजी झाला होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवशास्त्र विषयाच्या मुख्य नियामकांच्या बैठकीच्या वेळी लातूर येथील प्रमुख नियामकाने मोबाईलवर नमुना उत्तर पत्रिकेच्या हस्त लिखिताची छायाचित्रे काढून धाराशिव जिल्ह्यातील दोन शिक्षकांना पाठवल्याची घटना उघडकीस आली आहे.
राज्य मंडळाच्या शारदा सभागृहात गुरुवारी जीवशास्त्र विषयाच्या मुख्य नियामकांची बैठक होती़ त्यासाठी सर्व नऊ विभागीय मंडळांतील मुख्य नियामकांसह मराठी आणि उर्दू माध्यमाचे नियामक उपस्थित होते. सकाळी ११ वाजता बैठकीच्या वेळी सर्वांचे मोबाइल जमा करुन घेण्यात आले. बैठकीला एकूण १५ सदस्य असताना १४ मोबाइल जमा झाले.
त्यात लातूर विभागीय मंडळातील प्रमुख नियामक परमेश्वर फड याने मोबाइल नसल्याचे सांगितले. त्याबाबत त्यांनी लिहूनही दिले. बैठक सुरु झाल्यावर नमुना उत्तर पत्रिकेचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मराठी माध्यमाच्या एका सदस्याने संबंधित प्रमुख नियामक मोबाइलद्वारे हस्त लिखिताची छायाचित्रे काढत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
याबाबत विचारणा केल्यावर फड याने स्वत:कडे असलेला मोबाइल काढून दिला. या मोबाईलची पडताळणी केल्यावर त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील मंकणी येथील दोन शिक्षकांना ती छायाचित्रे पाठवल्याचे आढळून आले. त्यानंतर फड याचा मोबाइल जप्त करण्यात आला.
त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तोपर्यंत परमेश्वर फड हे तेथून पळून गेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत तपास करीत आहेत.















