कोंढवा पोलिसांची विशेष मोहिम : २० बुलेटच्या सायलेन्सरवर फिरवला रोड रोलर
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बुलेटच्या सायलेन्सरचा फटाका वाजवून नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. या विशेष मोहिमेअंतर्गत २० बुलेटच्या सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले.
सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्याचबरोबर रमजान महिना देखील सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर बुलेटच्या सायलेन्सरचा फटाका वाजवून नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी २८ फेब्रुवारी रोजी विशेष मोहिम राबवली.
या मोहिमेत एकाच दिवसात २० वाहनांवर कारवाई करण्यात आली. या गाड्यांचे मॉडिफाइड सायलेन्सर काढून त्यांच्यावर पुणे महापालिकेच्या रोड रोलरद्वारे कारवाई करण्यात आली.
ही विशेष मोहिम पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदारांच्या सहकार्याने राबवण्यात आली.
