पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, उपनिरीक्षक प्रसन्न जराड जखमी, गोळीबारात एक दरोडेखोर जखमी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खेड तालुक्यातील केंदूर घाटात पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसांवर दरोडेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जराड हे जखमी झाले. डॉ. शिवाजी पवार यांनी केलेल्या गोळीबारात एका दरोडेखोराच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला.
डॉ. पवार आणि जराड यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ही घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केंदूर घाटात मध्यरात्री घडली. डॉ. शिवाजी पवार यांच्या छातीवर, पाठीवर कोयत्याचा वार लागला असून प्रसन्न जराड यांच्या दंडावर जखम झाली आहे.
यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दरोडेखोरांवर दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एका दरोडेखोराच्या पायाला एक गोळी लागली आहे. सचिन चंदर भोसले याच्या पायाला गोळी लागली आहे. पोलिसांनी सचिन आणि त्याचा भाऊ मिथुन चंदर भोसले यांना पकडले आहे.
सचिन भोसले याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी ९ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बहुळ येथे काही दिवसांपूर्वी एका वृद्ध दाम्पत्याच्या घरात शिरुन सहा दरोडेखोरांनी चाकू आणि सुरीचा धाक दाखवून लुटमार केली होती.
त्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटुन नेली होती. या प्रकरणातील दरोडेखोर हे चिंचोशी गावात आणखी एक दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या दोन पथकांनी केंदूर घाटात सापळा लावला होता.
दरोडेखोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना झडप घालून पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दरोडेखोरांनी आपल्याकडील कोयत्याने डॉ. शिवाजी पवार व प्रसन्न जराड यांच्यावर हल्ला केला. कोयत्याचा वार लागून दोघेही जखमी झाले. डॉ. शिवाजी पवार यांनी केलेल्या गोळीबार सचिन भोसले हा जखमी झाला. अन्य पोलिसांनी मिथून भोसले याला पकडले. त्यांचा एका साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
