भारती हॉस्पिटल येथे डिपार्टमेंट ऑफ स्लीप मेडिसिनचे उदघाटन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मानवासाठी झोप ही सर्वात मोठी देणगी असून, झोप व्यवस्थित असेल तरच निरोगी आयुष्याचा पाया रचला जातो. असे मत प्रसिद्ध मेंदूविकारतज्ञ डॉ. राहुल कुलकर्णी यांनी भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे डिपार्टमेंट ऑफ स्लीप मेडिसिन या नव्या विभागाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले याप्रसंगी त्यांनी हे मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, आजच्या धकाधकीच्या जीवनात झोप कमी होत चालली आहे.
तरुणाईमध्ये नाईट लाईफचे वाढते प्रस्थ, मोबाईलचा अति वापर यामुळे झोपेच्या अनेक आजारांना निमंत्रण दिले जात आहे. झोपेची कमतरता सुरुवातीला किरकोळ वाटू शकते, परंतु दीर्घकालीन परिणाम गंभीर असू शकतात.
संतुलित आहार आणि व्यायामाइतकीच झोपही महत्त्वाची आहे. यावेळी भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. मंदार करमरकर, भारती हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. संजय ललवाणी, स्लीप मेडिसिनच्या डॉ. शांभवी जोशी हे मान्यवर उपस्थित होते.
१४ मार्च हा जागतिक स्लीप डे म्हणून साजरा केला जातो तसेच संपूर्ण आठवडा जनजागृती म्हणून राबवला जातो. आधुनिक जीवनशैलीमुळे झोपेच्या तक्रारी वाढत असून, निद्रानाश (इन्सोम्निया), स्लीप अॅपनिया आणि तणावामुळे असमाधानकारक झोप ही गंभीर समस्या बनली आहे.
यावर्षीचे सर्वांसाठी समान झोप – निरोगी जीवनाची गुरुकिल्ली हे या दिनाचे ब्रीदवाक्य झोपेचे महत्व अधोरेखित करते. संशोधनानुसार झोपेच्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक तणाव, हृदयरोग आणि कार्यक्षमतेत घट होऊ शकते.
महाराष्ट्रातील झोपेचे गंभीर वास्तव अलीकडील अहवालानुसार, ४०% शहरी लोकसंख्या झोपेच्या समस्यांनी त्रस्त आहे. विशेषतः पुणे आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये वाढत्या स्पर्धात्मक जीवनशैलीमुळे लोक झोपेच्या वेळेकडे दुर्लक्ष करत आहेत.
मानसिक आरोग्यासाठी झोपेचे महत्त्व : झोप तुमच्या मेंदूचे कार्य सुधारते. झोपताना, मेंदू पुढील दिवसाची तयारी करत असतो. नवीन गोष्टी शिकण्यास आणि लक्षात ठेवण्यास मदत करणारे न्यूरल मार्ग तयार होतात. संशोधन असे दर्शवते की चांगल्या झोपेमुळे शिकण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता सुधारते. तसेच, झोप निर्णयक्षमता, सर्जनशीलता आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.
