महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी अलिपूर रोड येथील ज्वारीच्या शेतामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत बिकट होती व तो कुजलेल्या स्थितीत असल्याने ओळख पटवणे कठीण होते. बार्शी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र हा खून असण्याची शक्यता होती.
मा. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलिसांनी विशेष तपास पथक तयार केले. सपोनि बाळासाहेब जाधव व पो. कॉ. इसामियाँ बहीरे यांनी मागील एक महिन्यापासून सदर मयत महिलेबाबत गुप्त माहिती गोळा केली.
बातमीदारांच्या मदतीने मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला बार्शी येथील अलिपूर रोडवर भाड्याने राहत होती आणि तिला भेटण्यासाठी एक पुरुष चार-पाच दिवसांतून एकदा येत असे.
या माहितीच्या आधारे महिलेच्या घरमालकाकडे चौकशी केली असता, ती धाराशिव जिल्ह्यातील असल्याचे समजले.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन पडताळणी केल्यानंतर बेपत्ता महिलेची ओळख पटली. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिनांक १८ नोव्हेंबर २०२४ पासून बेपत्ता असलेल्या अर्चना विनोद शिंदे (वय ३२, रा. घाटंग्री, जि. धाराशिव) हिचा तपास सुरू होता.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे नितीन प्रभू जाधव (रा. घाटंग्री, जि. धाराशिव) याचे नाव समोर आले. तपास अधिक गतीमान करून मा. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घाटंग्री येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला.
संशयित आरोपी नितीन प्रभू जाधव याला तांत्रिक तपासाद्वारे शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले. विश्वासात घेऊन विचारणा केली असता नितीन जाधव याने कबुली दिली की, अर्चना शिंदे ही त्याच्याच गावातील होती व ती मजुरीचे काम करत असे.
रोजच्या संपर्कातून त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. मागील दोन महिन्यांपासून त्याने तिला बार्शी येथे अलिपूर रोडवर भाड्याने खोली घेऊन दिली व तो तिला वारंवार भेटायला जात असे.
दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी, दोघांमध्ये वाद झाल्याने त्याने तिला गोड बोलून ज्वारीच्या शेतात नेले व स्कार्फने गळा आवळून हत्या केली. या प्रकरणात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु. र. नं. २६२/२०२५, भा. दं. वि. कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सपोनि प्रदीप झालटे करीत आहेत. ही उल्लेखनीय कारवाई मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या तपासात सपोनि बाळासाहेब जाधव, पो. ना. दत्तात्रय आडसूळ, पो. कॉ. इसामियाँ बहीरे, धनराज फत्तेपुरे, अविनाश पवार, राहुल उदार, ब्रह्मदेव वाघमारे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पो. कॉ. रतन जाधव या सर्व टिमने विशेष मेहनत घेतली. बार्शी शहर पोलिसांनी अत्यंत प्रभावी तपास यंत्रणा राबवून गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला व निर्दय खुनाचा आरोपी जेरबंद केला.
