शिवसृष्टीत खऱ्या इतिहासाचा समावेश करण्याची मागणी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी नगरपरिषद तर्फे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग शिल्परूपात साकारण्यात आले आहेत. तथापि, अफझल खान वध आणि लाल महालात शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचा ऐतिहासिक प्रसंग शिवसृष्टीतून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे.
हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेतील हे दोन प्रसंग अतिशय महत्त्वाचे मानले जातात. इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राईक म्हणून ओळखला जाणारा शाहिस्तेखानावरील हल्ला आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाचा वध हे युद्धतंत्र आज जागतिक लष्करी संस्थाही अभ्यासतात. मात्र, बार्शी नगरपरिषदेने हे प्रसंग शिवसृष्टीत समाविष्ट न केल्याने शिवराज्य सेनेच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषद कार्यालयावर आक्रमक आंदोलन केले.
यावेळी परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता. बार्शी पोलिसांच्या मध्यस्थीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी शिवराज्य सेनेच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेतली आणि या शिल्पांचा समावेश करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनादरम्यान, शिवराज्य सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाची प्रत भेट देत निषेध नोंदवला.
या आंदोलनात शिवराज्य सेनेचे प्रमुख हर्षवर्धन पाटील, प्रितम मोरे, आकाश राऊत, संतोष कोंढरे, राज जगताप, आदित्य कापसे, सोपान डोईफोडे, सागर हांडे, युवराज ढगे, श्रेयस परदेशी, महेंद्र देवकर, विवेक भागवत, निखिल बारसकर, सागर पवार, अमोल देशमाने, विनोद बुराडे, संदीप पाटील, विपूल तुपे ,शशी केमदारने, सुमित कुडगावकर यांच्यासह अनेक शिवभक्त सहभागी झाले होते.
