एकाच कामासाठी तिघा अधिकाऱ्यांनी मागितली लाच
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात एकाच कामासाठी तिघा अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तिघांनाही रंगेहाथ पकडले असून त्यांच्या कार्यालयातील बॅगेत तब्बल ₹ ८.५८ लाखांची रोख रक्कम सापडली आहे.
ही घटना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात घडली असून याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबुराव कृष्णा पवार (वय ५७) – कार्यकारी अभियंता, दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय ५५) – उपअभियंता, अंजली प्रमोद बगाडे – कनिष्ठ अभियंता अशी अटक झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहे.
तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून त्यांनी दौंड तालुक्यातील खुटबाव रोड ते गलांडवाडी पांदन शिव रस्ता आणि गलांडवाडी मंदिर ते ज्ञानदेव कदम घर रस्ता या कामांची वर्कऑर्डर मिळवली होती. या दोन्ही कामांची रक्कम ₹ ४० लाख होती.
कामाच्या पाहणीपासून ते अंतिम मंजुरीपर्यंत तिघा अधिकाऱ्यांनी मिळून प्रत्येकी २% लाचेची मागणी केली. त्यासाठी अंजली बगाडे यांनी ₹ १४,000, दत्तात्रेय पठारे यांनी ₹ ६४,000 आणि बाबुराव पवार यांनी ₹ ६४,000 याप्रमाणे एकूण ₹ १.४२ लाखांची लाच मागितली होती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक रुपेश जाधव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
ही कारवाई सरकारी विभागातील लाचखोरीवर मोठा आघात ठरली आहे. एकाच कार्यालयातील तीन अधिकारी एकाच कामासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर लाच घेत असल्याचे उघड झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
असा रचला सापळा
तक्रारदाराने यासंदर्भात १० मार्च २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर ११ मार्च २०२५ रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. या दरम्यान, तिघा अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषद कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून घेतलेले ₹ ६४,000 स्वीकारताना बाबुराव पवार यांना रंगेहात पकडले. त्याचप्रमाणे अंजली बगाडे हिने स्वतः मागितलेले ₹ १४,000 दत्तात्रेय पठारे यांच्याकडे सुपूर्त करण्यास सांगितले. त्या दोघांनाही लाच घेताना पकडण्यात आले.
कार्यालयात ८.५८ लाखांची रोकड जप्त
कारवाईदरम्यान बाबुराव पवार यांच्या कार्यालयातील एका बॅगेत तब्बल ₹८,५८,४०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली, जी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केली आहे. या तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
