प्रेमसंबंधाची माहिती दिली मुलीच्या भावाला : एकाच कुटुंबातील १२ जणांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तरुणाने प्रेमसंबंधाची माहिती मुलीच्या भावाला दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या भावाने प्रियकराला मारहाण केली होती. या रागातून तरुणावर कोयत्याने वार करून, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी एकाच कुटुंबातील १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत तेजस संतोष गजरमल (वय २४, रा. भिमाले कॉम्प्लेक्स, संदेशनगर, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गणेश वाघमारे (वय १९), योगिराज वाघमारे (वय ४६), जयश्री वाघमारे (वय ४५), युवराज वाघमारे, हर्षल बागडे (वय २४), प्रेरणा बागडे (वय १८), देवराज वाघमारे (वय ५०, सर्व रा. भिमाले कॉम्प्लेक्स, संदेशनगर, मार्केटयार्ड) आणि इतर सहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना १४ मार्च रोजी धूलिवंदनाच्या दिवशी दुपारी साडेचार वाजता भिमाले कॉम्प्लेक्समध्ये घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच भिमाले कॉम्प्लेक्समध्ये राहतात.
गणेश वाघमारे याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ही बाब फिर्यादी तेजस गजरमल याने त्या तरुणीच्या भावाला सांगितली. त्यामुळे मुलीच्या भावाने गणेश वाघमारे याला मारहाण केली होती. याचा राग गणेश व त्याच्या कुटुंबीयांना होता.धूलिवंदनाच्या दिवशी तेजस सोसायटीतील मुलांसोबत रंग खेळत होता. त्यावेळी गणेश वाघमारे व त्याचे कुटुंबीय तेथे आले.
गणेशने तेजसच्या कमरेतील धारदार शस्त्र काढून त्याच्या गळ्याला लावले. त्यामुळे इतर मुले घाबरून बाजूला झाली. त्याचवेळी गणेशचा चुलता योगिराज वाघमारे याने तेजसचे हात मागून पकडले
गणेश म्हणाला, “तू तिच्या भावाला सांगितले की आमचे प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे त्याने मला मारहाण केली होती. आज मी तुला जिवंत सोडणार नाही.
तुला माहिती आहे ना, माझ्यावर आधीच ३०७ चा गुन्हा दाखल आहे.” असे म्हणून त्याने तेजसच्या गळ्यावर धारदार शस्त्र दाबले.त्याचवेळी गणेशची आई जयश्री वाघमारे हिने तेजसची कॉलर पकडून म्हणाली, “गणेश, आज तेजसला सोडू नकोस, मारून टाक!” यानंतर इतर जण तेजसला लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागले.
त्यावेळी योगिराजची मुलगी प्रेरणा म्हणाली, “याला आज सोडायचे नाही. तो तुमचे लग्न होऊ देणार नाही!” प्रेरणाचा पती हर्षल बागडे यानेही तेजसला मारहाण केली. इमारतीमधील लोक सोडवण्यासाठी आले असता हर्षल बागडे याने कमरेतील हत्यार काढून तेजसच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला.
मात्र, तेजसने गणेशला ढकलले, त्यामुळे हर्षलचा वार त्याच्या स्वतःच्या पायाला लागला. तेजसने संधी साधून स्वतःची सुटका करून घेतली व मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात धाव घेतली. उपचार घेतल्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सदर प्रकरणाचा तपास पोलीस सहायक निरीक्षक अश्विनी कट्टे करत आहेत.
