प्रवाशांना लुटण्याचा होता बेत, बाणेर पोलिसांनी केली ६ जणांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मुंबई – पुणे महामार्गावरील सर्व्हिस रोडवर प्रवाशांना अडवून लुटण्यासाठी एकत्र आलेल्या चोरट्यांना बाणेर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
सोहम वाघमारे (वय २०, रा. महाळुंगे), कैफ शेख (वय १९, रा. बालेवाडी), नाथा वाघमारे (वय १८, रा. बालेवाडी), ताहीर मुलतान (वय १९, रा. बालेवाडी), सुमित गायकवाड (वय १९, रा. महाळुंगे), तुकाराम उचके (वय १९, रा. म्हातोबानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस अंमलदार दशरथ खुडे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मुंबई -पुणे महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर बालेवाडी येथील अमर टेकजवळ रविवारी पहाटे साडेतीन वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक मध्यरात्री पेट्रोलिंग करीत होते.
त्यावेळी त्यांना बालेवाडी येथील सर्व्हिस रोडवर काही जण अंधारात जमले असल्याचे दिसून आले. प्रवाशांना लुटण्याचा बेत आखुन ते एकत्र आले होते. पोलिसांनी त्यांना चारही बाजूने घेऊन पकडले. त्यांच्याकडे तलवारी, कोयता, मिरची पुड, सुतळीचा बंडल, चिकटपट्टी असे घातक शस्त्रे व साहित्य आढळून आले.
पोलिसांनी हे साहित्य जप्त केले आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर सर्व्हिस रोडवर येणाऱ्या प्रवाशांना अडवून त्यांना लुटण्याचा बेत आखून दरोड्याच्या तयारीने जमलो असल्याचे सांगितले. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण करीत आहेत.
