येरवड्यातील घटनेत भावाच्या डोक्यात दगड घालून केले जखमी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तरुणीने अंगावर रंग टाकू देण्यास नकार दिल्याने टोळक्याने या तरुणीला मारहाण केली. तिला सोडविण्यासाठी आलेल्या बहिणीला तसेच दोन भावांवर धारदार हत्याराने वार करुन जखमी केले. मुलाच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
प्रेम विकी ससाणे (वय १८, रा. यशवंतनगर, येरवडा), आयान शेख (वय १९, रा. यशवंतनगर, येरवडा), रोनाल्ड ऊर्फ गुंड्या आनंद (वय १९, रा. यशवंतनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या घटनेत गणेश मातंग (वय ११) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत होते.
याबाबत अश्विनी मातंग (वय ३०, रा. भारतीय समाजसेवा मित्र मंडळाजवळ, यशवंतनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १४ मार्च रोजी दुपारी पावणे तीन वाजता घडली होती. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुलिवंदनाच्या दिवशी फियार्दी यांनी त्यांची मुलगी नंदिनी (वय १७) हिला किराणा सामान आणण्यासाठी घराजवळील दुकानात पाठविले होते.
काही वेळाने घराबाहेर नंदिनी हिचा ओरडण्याचा आवाज आल्याने फिर्यादी व त्यांची मुले हे बाहेर आले. तेव्हा नंदिनी हिने सांगितले की, ती दुकानात जात असताना प्रेम विकी ससाणे व त्याचे मित्र बाहेर उभे होते. काही कारण नसताना तिच्या अंगावर रंग टाकू लागले.
मी रंग लावण्यास नकार देऊन घरी येत असताना ते शिवीगाळ करुन आले. ही भांडणे पाहून बहिणीचा मुलगा अमन मोहन अडागळे हा तिच्या मदतीला आला. ते त्यांना शिवीगाळ करत असताना आयान शेख याने त्याच्या हातातील हत्याराने फिर्यादीची दुसरी मुलगी रागिनी हिच्या पायाचे नडगीवर मारुन जखमी केले.
त्याचवेळी प्रेम ससाणे याने फिर्यादीचा मुलगा गणेश याच्या डोक्यात दगड मारला तर अफान शेख याने त्याच्याकडील हत्याराने गणेश याच्या हाताचे बोटावर मारुन त्याला गंभीर जखमी केले. गणेश चक्कर येऊन पडला. अमन अडागळे याला केतन गाडे, यश पाटील, गुंड्या यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले.
गणेश याला ससून रुग्णालयात नेत असता, त्याला अतिदक्षता विभागात दाखल करुन उपचार करण्यात आले. पोलीस हवालदार एस जे काळेल तपास करीत आहेत.
