बरगडी फॅक्चर : येरवड्यातील घटनेत चुलत भावासह ५ जणांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: गावावरून आलेल्या लहान भावाचे चुलत भावाच्या कामगारासोबत मजुरीवरून भांडण झाले. या कारणावरून चुलत भावाने व त्याच्या मुलांनी मोठ्या भावाला बेदम मारहाण केली. त्यात त्याच्या बरगडीला फॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला. येरवडा पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
या प्रकरणी वैजनाथ नानू राठोड (वय ३७, रा. रामनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश केशू राठोड (वय ३७), खुबासिंग कशू राठोड (वय ४५), नेहाल खुबासिंग राठोड (वय १९), नितीन सुभाष राठोड (वय २०) आणि निखील सुभाष राठोड (वय २२, सर्व रा. जयजवाननगर, येरवडा) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मिस्त्रीचे काम करतात. त्यांचा चुलत भाऊ खुबासिंग राठोड यांचा व्यवसाय असून ते जयजवाननगर येथे राहतात. फिर्यादी यांचा लहान भाऊ अनिल (वय ३२) हा आठवड्यापूर्वी गावाहून आला होता. अनिल राठोड याचे चुलत भाऊ रामू राठोड यांच्या कामगारासोबत मजुरीवरून भांडण झाले.
या भांडणाची माहिती कामगाराने रामू राठोड यांना दिली. त्यावरून ३० मार्च रोजी रात्री १० वाजता गणेश राठोड याने फिर्यादीला फोन करून शादलबाबा कमान येथे बोलावले. ते व त्यांचा मोठा मुलगा प्रिन्स तिथे गेले असता गणेश राठोड, खुबासिंग राठोड, नेहाल राठोड, नितीन राठोड आणि निखील राठोड तिथे उपस्थित होते. काही अंतरावर अनिल राठोड देखील उभा होता.
त्यावेळी गणेश राठोड याने “तुझ्या भावाने रामू विषयी असे का बोलले?” अशी विचारणा करत वैजनाथ यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पाठीमागून इतरांनीही मारहाण केली. अनिलने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता, खुबासिंगने त्यालाही मारहाण केली.
ही भांडणे थांबल्यानंतर फिर्यादी घरी निघाले. रामनगर येथे पोहोचल्यावर त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली. त्यांनी ही घटना पत्नीला सांगितली आणि जाब विचारण्यासाठी जयजवाननगर येथे गेले. मात्र, तिथेही गणेश राठोड आणि इतरांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
ते खाली पडल्यावर सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या त्यांच्या पत्नी आणि भाऊ अनिल यांनाही मारहाण करण्यात आली. ससून रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची डाव्या बाजूची बरगडी फॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले. येरवडा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
