पुण्यातील उपक्रमात १५ हजारांहून अधिक नागरिकांची नोंदणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिल्लीतील कार्यक्रमात सहभाग
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : धर्म, जात, पंथ या सीमा ओलांडून भारतासह १०८ देशांतील नागरिक एकत्र येऊन नवकार महामंत्राचे सामूहिक पठण करणार आहेत. विश्वशांती आणि कल्याणाचा संदेश देणाऱ्या या अद्वितीय उपक्रमाचे आयोजन बुधवार, ९ एप्रिल रोजी सकाळी ७:०२ ते ९:३६ या वेळेत करण्यात आले आहे. पुण्यातील एस. पी. कॉलेज मैदान, टिळक रोड येथे हा कार्यक्रम पार पडणार असून, देशभरातून विविध ठिकाणी एकाच वेळी नवकार मंत्राचा जप केला जाणार आहे.
या उपक्रमाची माहिती जितोचे चेअरमन इंद्रकुमार छाजेड, चिफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सेक्रेटरी लक्ष्मीकांत खाबिया, प्रविण चोरबेले आणि अभिजित डुंगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अनिल भंसाळी आणि ॲड. विशाल शिंगवी उपस्थित होते. दिल्लीतील विज्ञान भवनात होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, नामदार चंद्रकांत पाटील, नामदार माधुरी मिसाळ यांच्यासह पुण्यातील लोकप्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आले आहे.
सध्या संपूर्ण जगात अस्थिरता, हिंसा आणि अराजकता वाढली आहे. अशा काळात नवकार महामंत्राचे सामूहिक पठण ही सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची शक्ती ठेवते. नवकार मंत्राचे एकाच वेळी करोडो लोकांनी केलेले सामूहिक स्मरण जगभरात शांतता, अहिंसा आणि सदाचाराची भावना रुजवण्यास मदत करेल, असे इंद्रकुमार छाजेड यांनी सांगितले.
हा उपक्रम कोणत्याही धर्म, जात, व्यक्तीशी संबंधित नसून, ब्रह्मांडातील श्रेष्ठ गुणांना वंदन करण्यासाठी नवकार मंत्राचे स्मरण केले जाते. या दिवशी १०० हून अधिक अनुष्ठान होणार असून, सहा हजारांहून अधिक ठिकाणांहून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे जागतिक विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता आहे, अशी माहिती दिनेश ओसवाल आणि लक्ष्मीकांत खाबिया यांनी दिली. या उपक्रमात पुण्यातील १५ हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सामूहिक पठणात सहभागी व्हावे आणि विश्वशांतीसाठी प्रार्थना करावी, असे आवाहन प्रविण चोरबेले यांनी केले आहे.
