आंबेगाव पोलिसांनी उघडकीस आणले तीन गुन्हे : २ लाख २७ हजारांचा ऐवज जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : विद्यार्थी वसतीगृहात राहून आंबेगावमध्ये भरदुपारी कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या परराज्यातील अट्टल गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून, २ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
व्यंकटेश रमेश (वय २२, रा. एमआयटी कॉलेजजवळ, कोथरुड; मूळ रा. बंगळुरू, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे या संदर्भात लोकेश शिवराज भंडारी (वय ३७, रा. कोंढरे बिल्डिंग, सिलाई वर्ल्डसमोर, आंबेगाव) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
भंडारी हे टेम्पो चालक असून, बिसलेरी कंपनीच्या पाण्याची वाहतूक करतात. १७ मार्च रोजी दुपारी त्यांची पत्नी निरी विक्रीच्या टपरीवर गेली होती. त्यांची मुलेही घराला कुलूप लावून बाहेर गेली होती.
सायंकाळी साडेसहा वाजता भंडारी घरी परतल्यावर, त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले. चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे १० ग्रॅमचे मंगळसूत्र, ५ ग्रॅमचे कानातील झुमके, १० ग्रॅमची सोन्याची चैन, १० ग्रॅमची अंगठी व १० हजार रुपये रोख असा सुमारे ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. (सध्याच्या बाजारभावानुसार या ऐवजाची किंमत अंदाजे २ लाख ८० हजार रुपये आहे.)
या गुन्ह्याचा तपास करत असताना आंबेगाव पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. त्यानुसार व्यंकटेश रमेश याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने बावधन व लोणीकंद परिसरातही घरफोडी केल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून २ लाख २७ हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.आरोपी व्यंकटेश रमेश हा मूळचा बंगळुरूचा असून, सध्या कोथरूड येथील एका खासगी वसतिगृहात (पीजी) राहत होता.
वसतिगृहात राहूनच तो घरफोडीचे गुन्हे करत होता. त्याने आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता असून, त्या दृष्टीने तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, तसेच पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, हनमंत मासाळ, चेतन गोरे, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे आणि समाधान कांबळे यांनी केली आहे.
