अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी कॅब पळवून नेण्यासाठी केला होता खून
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी कॅबचालकाचा खून करून कार चोरून नेणाऱ्या गुन्हेगाराला सत्र न्यायालयाने जन्मठेप व ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
तपिश चौधरी (वय २६, रा. गगन उन्नती सोसायटी, ईस्कॉन मंदिराशेजारी, कोंढवा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने कॅबचालक सुनिल शास्त्री (वय ५२, रा. घरकुल प्रॉपर्टीज, पठारे वस्ती, लोहगाव) यांचा २२ जून २०१९ रोजी खून करून कॅब चोरून नेली होती.
कोंढवा पोलिसांना कात्रज-कोंढवा रस्त्यावर २२ जून २०१९ रोजी एक मृतदेह आढळून आला होता. आरोपीची ओळख पटेल, असा कोणताही पुरावा उपलब्ध नव्हता. पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, विमानतळाजवळील एका सीसीटीव्हीमध्ये मृत व्यक्तीसारखा दिसणारा कॅबचालक आढळून आला. त्यावरून सुनिल शास्त्री यांची ओळख पटली.
यानंतर पोलिसांनी ओला कंपनीच्या मदतीने कॅबचे लोकेशन शोधले असता, ती स्विफ्ट कार गुजरात-राजस्थान सीमेवर असल्याचे आढळले. गुजरात पोलिसांना त्याची माहिती व लोकेशन पाठविल्यानंतर, पोलिसांनी अमीरगड चेकपोस्टवर गाडीसह तपिशकुमार चौधरी याला पकडले. अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी त्याने ही गाडी चोरली होती.
आरोपीने रात्री बारा वाजता वाकड येथून कोंढवा येथे जाण्यासाठी ओला कॅब बुक केली होती. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोंढव्याजवळ गाडी थांबल्यावर चौधरीने चालक सुनिल शास्त्री यांचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह बाहेर फेकून कार घेऊन तो पसार झाला.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सबळ साक्षी-पुराव्याअंती सत्र न्यायालयाने आरोपी तपिश चौधरी याला जन्मठेप व ५० हजार रुपये दंड, व दंड न भरल्यास तीन वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली.
सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील मिलिंद दातरंगे, प्रदीप गेहलोत आणि कोर्ट पेरवीसाठी सहाय्यक पोलीस फौजदार महेश जगताप यांनी काम पाहिले. या कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे व कोर्ट पेरवी सहाय्यक पोलीस फौजदार महेश जगताप यांना १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
न्यायालयाने आरोपीला शिक्षा देताना केलेल्या ५० हजार रुपयांच्या दंडापैकी २५ हजार रुपये शास्त्री यांच्या कायदेशीर वारसाला द्यावेत, असा आदेश दिला आहे. त्याचबरोबर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सुनिल शास्त्री यांच्या कायदेशीर वारसाला २ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याबाबत शिफारस करावी, असे सांगितले आहे.
