भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : रिक्षाचालकावर वार करून केला होता खुनाचा प्रयत्न
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : रिक्षाचालकावर हत्याराने वार करून सिंहगड कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरवणाऱ्या गुंडाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ज्या कॉलेजच्या परिसरात त्याने दहशत पसरवली होती, त्या परिसरात पोलिसांनी त्याची धिंड काढली.
तन्मय सखाराम भुसारी (वय २०, रा. सिंहगड कॅम्पस, वडगाव; मूळ रा. बुलढाणा) असे या गुंडाचे नाव आहे. याबाबत रिहान महंमद होडगी (वय १८, रा. आंबेगाव) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
रिहान हा पूर्वी सिंहगड लॉ कॉलेजसमोरील समर्थ चहाच्या टपरीचे मालक प्रसाद लोकरे यांच्याकडे काम करत होता. ८ एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजता तो रिक्षा घेऊन निघाला होता. चहा पिण्यासाठी तो समर्थ चहाच्या टपरीवर गेला होता.
त्याच्या ओळखीचे तन्मय भुसारी आणि ज्ञानेश्वर हे दोघे भांडत होते. तेव्हा त्याने तन्मय भुसारीला विचारले, “कशाला भांडत आहेस?” त्यावर तन्मयने “तु मला मारणार का?” असे म्हणत धारदार हत्याराने रिहानवर वार करून त्याला गंभीर जखमी केले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.
तन्मय भुसारीला १२ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. सिंहगड कॉलेजमध्ये रिहानवर हत्याराने वार करून तन्मयने दहशत पसरवली होती, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कॉलेज आवारात विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या टवाळखोर मुलांमध्ये पोलिसांची दहशत निर्माण होणे गरजेचे होते.
सिंहगड कॉलेजमध्ये शांततेचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी ज्या ठिकाणी हा प्रकार घडला होता, त्या समर्थ चहाच्या टपरी परिसरात तन्मय भुसारीची धिंड काढली. त्या ठिकाणच्या नागरिकांना आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भयमुक्त करण्यात आले.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल खिलारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि पोलीस अंमलदारांनी केली आहे.
