‘चितळे स्वीट होम’चे प्रमोद चितळे यांच्यावर गुन्हा : ग्राहकांच्या तक्रारीवरुन प्रकार उघडकीस
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : चितळे बंधु मिठाईवाले यांच्यासारखीचे हुबेहुब पाकीट व इतर माहिती वापरुन कमी दर्जाची बाकरवडी बाजारपेठेत विक्री करुन फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सुमारे एक वर्षांपासून सुरु असल्याचे उघड झाले आहे.
याबाबत चितळे बंधु मिठाईवाले यांच्यवतीने इंद्रनिल चितळे यांचे पर्सनल सेक्रेटरी नितिन अभिमन्यु दळवी (वय ३५) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन चितळे स्वीट होमचे मालक प्रमोद प्रभाकर चितळे (रा. सदाशिव पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सुमारे एक वर्षांपासून सुरु होता.
चितळे बंधु मिठाईवाले यांच्या व्यवसायाला नुकतीच ७५ वर्षे झाल्यानिमित्ताने त्यांनी लोकप्रिय क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्याकडून जाहिरातीची मोठी मोहिम राबविली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चितळे बंधु मिठाईवाले यांचा भोर तालुक्यातील रांजे येथे बाकरवाडी तयार करण्याचा मुख्य प्लॉंट आहे.
याशिवाय पर्वती इंडस्ट्रीयल, टिमवि कॉलनी, मुकुंदनगर या ठिकाणी देखील बाकरवडी तयार करण्याचे छोटे युनिट आहे. गेल्या काही दिवसांपासून चितळे बंधु मिठाईवाले यांना बाकरवडीची चव बदल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारींची दाखल घेत फियार्दी यांनी बाजारात मिळणाऱ्या जिओ मार्ट व डी मार्ट तसेच काही ठिकाणाहून चितळे स्वीट होम नावाने विक्रीस असणाऱ्या बाकरवडीचे पाकिटे खरेदी केली. चितळे स्वीट होम नावाने असणारे बाकरवडीची पाकिटे आणि चितळे बंधुच्या नियमित तयार होणाऱ्या बाकरवडीच्या पाकिटांमध्ये तफावत दिसून आली.
तसेच त्या पाकिटावर चितळे बंधु मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर व वेबसाईट हे पाकिटांच्या साईड पट्टीवर हुबेहुब छापले असल्याचे दिसून आले. अशाप्रकारे ‘चितळे स्वीट होम’चे मालक प्रमोद प्रभाकर चितळे यांनी चितळे बंधु मिळाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरींग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती स्वत:चे प्रोडक्शन असलेल्या बाकरवडीच्या पाकिटावर वापरले.
चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करून आर्थिक नुकसान करुन चितळे बंधू मिठाईवाले यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
कमी दर्जाची किंवा योग्य चव नसलेली बाकरवडी मिळत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांकडून येत होत्या. या तक्रारींची खातरजमा केली असता हा प्रकार उघडकीस आला. आमचे ग्राहकांना आवाहन आहे की, चितळेचे कोणतेही उत्पादन घेताना ते खरे आहे की बनावट हे त्या उत्पादनावर असलेल्या माहितीच्या आधारे तपासावे. तसेच शक्यतो आमच्या अधिकृत केंद्रावरून किंवा संकेतस्थळावरूनच खरेदी करावी. ग्राहकांची फसवणूक होऊ नये या उद्देशातून आम्ही ही तक्रार दिलेली आहे. – इंद्रनिल चितळे, चितळे बंधू मिठाईवाले
