थेट उत्पादकांकडून खरेदीचा महापालिकेचा मोठा निर्णय
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगरपालिकेतील डांबर खरेदीसंबंधीच्या गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे ठेकेदारामार्फत डांबर खरेदी न करता, थेट उत्पादक कंपन्यांकडूनच डांबर खरेदी केली जाणार आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशीही सुरू असून लवकरच चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
महापालिका आता थेट उत्पादकांकडून डांबर खरेदी करत असल्यामुळे त्याची वाहतूकही पालिकेलाच करावी लागत आहे. मात्र, सध्या ही नवी व्यवस्था पूर्णपणे सुरळीत कार्यान्वित झालेली नाही. उत्पादक कंपन्यांकडून आवश्यकतेनुसार डांबर पुरवठा होत नसल्यामुळे, येरवडा येथील एकमेव हॉट मिक्स प्लांटदेखील बंद ठेवावा लागत आहे.
महापालिकेतील डांबर खरेदीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अॅड. नीलेश निकम यांनी केला होता. त्यांनी या आरोपांबाबत कागदपत्रांसह चौकशीची मागणी आयुक्त डॉ. भोसले यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ठेकेदारामार्फत डांबर खरेदी प्रक्रिया थांबवून थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
अॅड. निकम यांनी केलेल्या आरोपांनुसार, डांबर खरेदीच्या निविदा प्रक्रियेत एकाच ठेकेदाराला सातत्याने काम मिळत होते. त्यामुळे गैरव्यवहार होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले होते. याच पार्श्वभूमीवर पथविभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे चौकशीचे आदेश देण्यात आले असून लवकरच त्यांचा अहवाल सादर होणार आहे.
नवीन धोरणांतर्गत, येत्या तीन महिन्यांसाठी सुमारे १२ कोटी रुपयांचे डांबर थेट उत्पादकांकडून खरेदी केले जाणार आहे. मात्र, थेट खरेदीमुळे वाहतुकीचा खर्चही महापालिकेलाच करावा लागत आहे.
महापालिकेला वर्षभरात सुमारे ३,००० टन डांबराची गरज असते.
पूर्वी हे डांबर मुंबईतील उत्पादक कंपन्यांकडून थेट खरेदी केले जात होते. मात्र, तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांनी ही प्रक्रिया बदलून ठेकेदारामार्फत खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे महापालिकेचे प्रतिटन अंदाजे ४ ते ५ हजार रुपयांचे नुकसान होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
