दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरण : असंवेदनशीलता व वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तनिषा ऊर्फ ईश्वरी भिसे यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार न करता तिष्ठत ठेवल्याने वैद्यकीय हलगर्जीपणा (मेडिकल निग्लिजन्स) केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी डॉ. सुश्रृत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्यांतर्गत कायद्यानुसार पाच वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. प्रियंका अक्षय पाटे यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉ. सुश्रृत घैसास यांना तनिषा भिसे या क्रिटिकल अवस्थेत असल्याची माहिती असूनही, त्यांनी पैशांसाठी आम्हाला आणि रुग्णाला वेठीस धरून साडेपाच तासांपर्यंत कोणतेही सुवर्णकालीन उपचार (गोल्डन अवर्स ट्रीटमेंट) केले नाहीत.
त्यामुळे गुंतागुंत वाढत गेली. उपचारासाठी करण्यात आलेल्या दिरंगाईमुळे रुग्णाचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे. तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉ. घैसास यांनी त्यांची तपासणी केली.
त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागेल, तसेच जन्मणाऱ्या बाळांना काचेच्या पेटीत ठेवावे लागेल, यासाठी २० लाख रुपयांचा खर्च येईल. तुम्ही १० लाख रुपये अॅडव्हान्स भरा, असे डॉ. घैसास यांनी सांगितले.
त्यावर भिसे कुटुंबीयांनी तीन लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, डॉ. घैसास यांच्या म्हणण्यानुसार १० लाख रुपये भरल्याशिवाय अॅडमिट करता येणार नाही, असे प्रशासनाने सांगितले आणि पुढील उपचार करण्यास नकार दिला.
शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलचा ड्रेस घातल्यानंतरही त्यांना साडेपाच तास तिष्ठत ठेवून अॅडमिट करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे त्यांनी दोन बाळांना जन्म दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकारामुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली. दीनानाथ हॉस्पिटलच्या बाहेर विविध संघटनांनी आंदोलन करून या घटनेचा निषेध केला. महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
आरोग्य विभागाच्या अहवालात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला. मातामृत्यू अन्वेषण समितीने आपला अहवाल तयार केला होता. धर्मादाय आयुक्त कार्यालयानेही चौकशी अहवाल शासनाला सादर केला.
त्यानंतर ससून रुग्णालयाच्या चौथ्या अहवालात काही संदिग्ध बाबींचा उल्लेख करण्यात आला. दीनानाथ हॉस्पिटलला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला. त्यानंतर शनिवारी दुपारी अलंकार पोलीस ठाण्यात वैद्यकीय हलगर्जीपणाच्या आरोपाखाली डॉ. सुश्रृत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
