पाषाणमधील घटना : डायल ११२ वर तक्रार आल्याचे सांगून धमकावले
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सोसायटीतील स्लॅबच्या कामाला उशीर झाल्याने आलेल्या पोलिसांनी इतक्या रात्री काम का सुरु ठेवले आहे. तुमच्याविषयी डायल ११२ वर तक्रार आल्याचे सांगून पाषाण येथील एका सोसायटीच्या अध्यक्षाकडून ३ हजार रुपये लाच घेणाऱ्या कॉप्स २४ बीट मार्शल असलेल्या तिघा पोलीस अंमलदारांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी आदेश काढला आहे.
पोलीस अंमलदार संतोष जगु शिंदे, प्रतिक महेश त्रिंबके, दिनेश संतोष इंगळे अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत. हे तीनही पोलीस अंमलदार गुन्हे शाखेच्या कॉप्स २४ बीट मार्शल म्हणून कार्यरत होते.
पाषाण येथील शिवालय सोसायटीच्या पार्किंगची फ्लोअरिंग खराब झाली होते.त्यावर स्लॅब टाकून दुरुस्ती करण्याचे काम रविवारी १३ एप्रिल २०२५ रोजी सुरु होते. ठेकेदाराला कामासाठी लागणारे आर एम सी उशिरा मिळाले.
त्यामुळे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. पोलीस अंमलदार हे बाणेर सी आर मोबाईल घेऊन रात्री १२ वाजण्याच्या सुमारास तेथे गेले. गाडीतून ३ अंमलदार उतरले. त्यांनी सोसायटीच्या अध्यक्षांना म्हणाले की काम का सुरु केले आहे.
हे काम बंद करुन टाका, तुमच्या विरुद्ध डायल ११२ वर तक्रार आली आहे़, असे सांगून तुम्ही आमच्यासोबत बालेवाडी पोलीस स्टेशनला चला, असे म्हणाले, त्या पोलिसांपैकी एक जण अध्यक्षांजवळ आला आणि म्हणाला की, तुम्ही एक काम करा, आम्हाला थोडे पैसे द्या, तुमचे काम १५ ते २० मिनिटात पूर्ण होईल, परत कोणाची तक्रार आली तर आम्ही अर्ध्या तासाने येतो, अर्ध्या तासाने आम्ही आल्यानंतर काम सुरु नाही पाहिजे, असे म्हणाला.
त्यावर त्यांनी किती पैसे असे विचारल्यावर बाणेर सीआर मोबाईल गाडी चालकाने ५ हजार रुपयांची मागणी करुन तडजोड अंती ३ हजार रुपये स्वीकारले. याबाबतची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे आली.
त्याची खंडणी विरोधी पथकाने चौकशी केली. त्यात या तिघांनी पैसे मागितल्याचे निष्पन्न झाले. खंडणी विरोधी पथकाच्या अहवालानंतर पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या तिघांना निलंबित केले.
