कात्रज तलावात उडी मारलेल्या तरुणीचा वाचविला जीव
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कात्रज येथील पेशवे तलावात एका तरुणीने उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दशरथ तळेवाड यांनी प्रसंगावधान राखत पाण्यात उडी मारुन या तरुणीला सुखरुप बाहेर काढून तिचे प्राण वाचवले होते.
दशरथ तळेवाड यांच्या धाडसाचे कौतुक करताना कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडून सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांच्या पुढाकाराने त्यांचा डॉ. दत्ता कोहीनकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कात्रज येथील पेशवे तलावात १९ एप्रिल रोजी सकाळी एका तरुणीने उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथे असलेल्या नागरिकांनी व सुरक्षा रक्षकांनी आरडाओरडा केला.
यावेळी तेथून कामावर जात असलेल्या दशरथ तळेवाड यांनी हा आरडाओरडा ऐकून तिकडे धाव घेतली. तरुणी बुडत असल्याचे पाहून त्यांनी पाण्यात उडी मारुन तिचा जीव वाचविला.
दशरथ तळेवाड यांच्या कामाचे कौतुक करताना डॉ. दत्ता कोहिनकर यांनी सांगितले की, दशरथ तळेवाड यांच्यासारख्या व्यक्ती समाजासाठी प्रेरणास्थान आहेत.
रामतीर्थ, पु ल देशपांडे यांचा दाखला देत समाजासाठी कार्य करणाऱ्यांचा आपण नेहमीच सन्मान केला पाहिजे. यावेळी पुणे महापालिकेचे उपअभियंता राखी चौधरी, प्रशासन अधिकारी सुनिल मोरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम, जालिंदर कदम यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.















