पोलीस आयुक्तांनी केली नागपूर कारागृहात स्थानबद्ध
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पदमावती परिसरात दहशत माजवून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याला स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.
मयूर रंगनाथ आरडे (वय २४, रा. तळजाई वसाहत, पदमावती) असे या गुंडाचे नाव आहे. मयूर आरडे हा सहकारनगर परिसरात २०१९ पासून गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय आहे.
त्याच्याविरुद्ध शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
घातक शस्त्रे जवळ बाळगून दहशत निर्माण करणे, दुखापत करणे, दरोडा टाकणे, खुनाचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणे अशाप्रकारे गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
मयूर आरडे याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनही त्याच्यात काहीच फरक पडलेला नव्हता.
तो अत्यंत क्रूर, खुनशी व भांडखोर असून, तो लोकांमध्ये काही ना काही कुरापती काढून मारहाण करून आपला हेतू साध्य करीत असतो. तो शस्त्र बाळगून असल्यामुळे लोकांमध्ये त्याची दहशत आहे.
त्याच्या दहशतीमुळे आणि भीतीमुळे कोणीही त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यास धजावत नाही सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना सादर केला.
अमितेश कुमार यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून त्याला एक वर्ष नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. सहकारनगर पोलिसांनी त्याला तळजाई भागातून ताब्यात घेऊन २४ एप्रिल रोजी स्थानबद्ध आदेशाची अंमलबजावणी करून नागपूर कारागृहात रवानगी केली आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड, पोलीस अंमलदार भाऊसाहेब आहेर, विनायक ऐडके, गोरख ढगे, किरण कांबळे, मंडलिक, सागर सुतकर, बजरंग पवार, अमोल पवार, आकाश किर्तीकर, अमोल पदमाळे, योगेश ढाले, मारुती नलवाड, महेश भगत, प्रदीप रेणुसे, खंडू शिंदे यांनी केली आहे.
